महामार्गावर नागरी वस्तीसाठी रस्ता नसल्याने अपघाताचा धोका

महामार्गावर नागरी वस्तीसाठी रस्ता नसल्याने अपघाताचा धोका

शहर हद्दीतून नवीन सिमेंट काँक्रिटचा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी रस्ता आकाराला येत असताना रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या नागरी वस्तीसाठी महामार्गावर येण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने गैरसोयीसह अपधाताचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिकांनी संघर्ष कृती समितीची स्थापन केली असून, प्रशासनासह संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्यात येणार आहे. चरई फाटा येथून शहराच्या मध्य भागातून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महामार्ग बांधकाम विभाग (महाड) यांच्या अख्यत्यारित एल अँड टी ही ठेकेदार कंपनी करीत आहे. चरई फाटा ते पोलीस ठाणेपर्यंतच्या १ किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. चौपदरी रस्ता मूळ पृष्ठभागापासून खोल जमिनीखालून जात असून, पोलीस ठाण्यापर्यंत सडवली पुलाला जोडण्यात येणार आहे. वास्तविक दोन्ही बाजूला असलेल्या वस्तीकरिता स्वतंत्र रस्ता असणे आवश्यक आणि महत्त्वाचे असताना केवळ भूमिगत रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नागरी वस्तीतील नागरिकांना जा-ये करण्यासाठी तयार होत आहे.

मात्र उर्वरित पाचशे मीटर अंतरात पूर्व आणि पश्चिम बाजूस असलेल्या प्रभात नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रोहिदास नगर, समर्थनगर, शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि पशू वैद्यकीय विभाग, सावंत कोंड, पार्टे कोंड या नागरी वस्तीला जा-ये करण्यासाठी रस्ता नाही. परिणामी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही बाजूकडील रहिवाशांना दुचाकी किंवा चारचाकीने महामार्गावर यायचे असेल तर वेगाने जा-ये करणार्‍या वाहनांपासून अपघात होण्याचा धोका आहे. या दोन्ही बाजूला अंदाजे तीनशेपर्यंत घरे आणी इमारती असून, तेथील रहिवाशांची गैरसोय होणार आहे. यामुळे रहिवासी एकवटले असून, चौपदरी रस्त्याच्या बाजूला स्वतंत्र ५०० मीटर अंतराच्या रस्त्याची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन करण्याचा निर्धार रहिवासी सचिन मेहता, ज्ञानदेव पार्टें, रामदास हाटे यांच्यासह ५०० नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा – 

मराठा आरक्षण: आमचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

First Published on: January 28, 2021 2:37 PM
Exit mobile version