जवानांनी बांधले मंदिरासमोर महाप्रवेशद्वार

जवानांनी बांधले मंदिरासमोर महाप्रवेशद्वार

तालुक्यातील देवपूर येथील तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले श्री कोंडजाई वाघजाई स्वयंभू मंदिरासमोर वेशीवर सैन्य दलातील स्थानिक आजी-माजी अधिकारी, जवानांनी बांधलेल्या महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दरेकर यांनी एका देखण्या आणि भव्य प्रवेशद्वाराची उभारणी करून मंदिराच्या परिसराची शोभा वाढविणार्‍या सैन्यातील आजी-माजी अधिकारी, जवानांचे कौतुक केले. सैनिकांसाठी ज्या-ज्या योजना असतात त्या आपण शासनाला सूचवत असल्याचे सांगून त्यांनी मुंबईमध्ये सैनिकांचे संपर्क कार्यालय उभे राहिले पाहिजे त्यासाठी आर्थिक मदत केल्याचेही स्पष्ट केले. सैन्य दलाविषयी आदराची भावना व्यक्त करतानाच दरेकर यांनी सैनिकांना कामानिमित्त तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात हे योग्य नसल्याचे सांगून यासाठी समन्वय साधणारी सक्षम यंत्रणा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी स्थानिक आमदार भरत गोगावले, उपसरपंच जगदिश गायकवाड, कर्नल अशोक जाधव, सुप्रसिद्ध उद्योगपती किसन भोसले, शिवचरित्र व्याख्याते यशवंत गोसावी, शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, कॅप्टन काशीराम चव्हाण, नायक मराठा कोंढवी विभाग अध्यक्ष सत्यवान महाडिक यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १३७ आजी-माजी फौजी संघटना देवपूर या संस्थेने परिश्रम घेतले.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नेत्रदीपक आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ब्लॅक कॅट कमांडो अरुणकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सैन्य दलातील प्रात्यक्षिके, उरी सर्जिकल स्ट्राईकचे नाट्य रूपांतर सादर करण्यात आले. अश्वारूढ झालेल्या शिवरायांच्या आगमनाचा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.

हेही वाचा –

कोरोनाच्या उद्रेकामुळे मुंबईतील ६०० हून अधिक इमारती सील

First Published on: April 3, 2021 3:15 PM
Exit mobile version