बाळंतपणानंतर आईचा आहार कसा असावा?

प्रसूतीनंतर तिची जबाबदारीही वाढते. शरीराची झालेली झीज भरून काढण्याबरोबरच बाळाचीही काळजी तिला घ्यायची असते. यामुळे प्रसूतीनंतर स्त्रियांना पौष्टीक आहार घ्यायला हवा.

गर्भारपण ते प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ असतो. दिवस गेल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत  स्त्रीला स्वत:बरोबरच बाळाचीही काळजी घ्यावी लागते. पण प्रसूतीवेळी आणि नंतर मात्र स्त्रियांच्या शरीरात वातदोष निर्माण होतो. तसेच प्रसूतीवेळी बाळाला जन्म देताना प्रसूती वेदनांमुळे ती प्रचंड थकलेली असते. पण प्रसूतीनंतर तिची जबाबदारीही वाढते. शरीराची झालेली झीज भरून काढण्याबरोबरच बाळाचीही काळजी तिला घ्यायची असते. यामुळे प्रसूतीनंतर स्त्रियांना पौष्टीक आहार घ्यायला हवा.

प्रसूतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला असतो. यामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल झालेले असतात.यामुळे प्रसूतीनंतर पचनास सोपे जावे आणि चांगले दूध यावे यासाठी द्रव व पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यासाठी गरम व ताजे अन्न खावे.

बाळंत झाल्यानंतर पहीले तीन दिवस गर्भाशय शु्द्धीसाठी हळदीची गोळी, काळा बोळ, खसखशीची, खारकेची खीर, गव्हाची खीर सकाळी घ्यावी.

दुपारच्या जेवणात साधा पण प्रोटीनयुक्त जोवण घ्यावे. सुरुवातीच्या दिवसात पचेल असे साधे सकस जेवण बाळंतिणीने करावे. यात वरण भात, पालेभाजी, भाकरीचा समावेश करावा. मांसाहार करत असल्यास सूप्स, अंड्यांचाही आहारात समावेश करावा.आठ दिवसांनंतर बाळंतिणीला सुका मेवा टाकलेले डिंकाचे, मेथीचे, खारीक खोबऱ्याचे, अळीवाचे लाडू खाण्यास द्यावे. त्यामुळे स्त्रिच्या शरीरात निर्माण झालेला वातदोष कमी होतो.

डिंकामुळे हाडाची झीज भरून निघते. अळीवामुळे केस गळणे थांबते. तसेच आहारात तूपाचाही समावेश करावा. दूध चांगले यावे यासाठी शतावरी कल्प घ्यावे. दूध प्यावे. आराम करावा पुरेशी झोप घ्यावी. सव्वा महिना झाल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोपा व्यायमास सुरुवात करावी.