पालघरः पालघर जिल्हा परिषदेच्या उमेद विभागा अंतर्गत काम करीत असलेल्या महिला वर्गास काही उच्चपदस्थ अधिकारी वर्गाकडून जाणीवपूर्वक चुका काढून त्यांना तासनतास कार्यालयात बसून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत अधिकारी जिल्हा परिषद अभय देत असल्याचीही तक्रार आहे. शासनाच्या ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत येणार्या बचत गटांना एकत्रित आणण्याचे काम उमेदमार्फत राबवण्यात येते. महिलांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने उमेद मधून कामकाज चालते. मात्र पालघर येथील उमेदच्या कार्यालयात महिला वर्गास शारीरिक शोषण होत असल्याचे गंभीर तक्रार पुढे येत आहे. ज्या महिलेने प्रतिकार केल्यास तिला कार्यालयात बसवून ठेवून मानसिक त्रास देण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.
या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने अनेक जण काम करत आहेत. इथे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र हा रोजगार देताना त्या पदास तो पात्र नसेल तर त्याच्याकडून नोकरी लावण्याचा उद्देशाने पैसे घेतले असल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने एका कर्मचार्यावर अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत त्याला कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. कामावरून कमी करताना देण्यात आलेली कारणे तितकी गंभीर नसताना त्याला आताच कामावरून काढण्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमेदमध्ये होत असलेल्या गडबडीविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अधिकार्यांनी तो प्रश्न हसून उडवून लावला होता. मात्र त्यानंतर सदस्यांनी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी ताकीद दिल्यावर याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी भूमिका जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यावेळी घेऊन सदस्यांना शांत केले होते.
०००
तक्रारींची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात येऊन त्यात तथ्य आढल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
—भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी
०००
ज्या महिलांना त्रास झाला आहे, त्यांनी न घाबरता आमच्या कार्यालयात तक्रार करावी. संबंधित अधिकारी दबाव टाकत असल्यास त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून निष्पक्षपणे चौकशी केली जाईल.
—प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद