भाजपाला ‘आदर्श’ अशोक चव्हाणांची आठवण; ट्वीट करत उकरला घोटाळा

भाजपाला ‘आदर्श’ अशोक चव्हाणांची आठवण; ट्वीट करत उकरला घोटाळा

संग्रहित छायाचित्र

BJP Tweet on Adarsha Scam | मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आलेला असतानाच भाजपाने त्यांचा आदर्श घोटाळा उकरून काढला आहे. “भारत तोडो : काँग्रेसची खरी प्रतिमा” या मोहिमेअंतर्गत भाजपाने अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याबाबत ट्वीट केलं आहे.

पक्षावर नाराजी असल्याकारणाने अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी गैरहजेरी, महामोर्चात अनुपस्थित, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदांना दांडी आदी विविध कारणांमुळे अशोक चव्हाण लवकरच भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांना क्लीनचिट मिळाली असली तरीही हा घोटाळा उजेडात आला तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यामुळे भाजपाने आता त्यावरूनच अशोक चव्हाणांना छेडलं आहे.

आदर्श घोटाळा काय?

२०१० मध्ये कुलाब्यातील आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा बाहेर आला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. कारगिल युद्धातील हिरोंसाठी आदर्श सोसायटीत तीन फ्लॅट्स राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, यावर अशोक चव्हाणांनी कब्जा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

भाजपाचं ट्वीट काय?

“२०११ रोजी सीबीआयने अशोक चव्हाणांसह १४ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर, २०१२ रोजी पहिली चार्जशीट दाखल केली होती. तर, १३ पैकी ९ जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र, २०१३ मध्ये अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यास तत्कालीन राज्यपालांनी (काँग्रेसप्रणित) नकार दिला. या प्रकरणातून नाव वगळण्यात यावं याकरता अशोक चव्हाणांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालायने फेटाळून लावली. तर, २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार भारतीय लष्कराने आदर्श इमारत ताब्यात घेतली,” असे ट्वीट भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षांतराच्या वावड्या उठलेल्या असतानाच भाजपाने चव्हाणांना का टार्गेट केलं असेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


अशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या चर्चा का सुरू झाल्या?

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या पराभवाची पक्षाने चौकशी केली. हंडोरे यांच्या पराभवाच्या संशयाची सुई अशोक चव्हाण यांच्याकडे होती.

शिवसेनेसोबत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेवर आलं. तेव्हा विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्यावेळी अशोक चव्हाण यांना विधानभवनात पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे ते बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहिले. त्यांच्या या गैरहजेरीमुळे चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळांत उधाण आले होते. त्यावेळी काँग्रेसचे सहा आमदार अनुपस्थित होते. मात्र, सर्वांचा चव्हाणांवरच रोख होता. परंतु, आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत, असा खुलासाही त्यांनी केला होता.

हेही वाचा – अशोक चव्हाण, वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीचे कारण काय?

गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विविध ठिकाणी भेटी देत होते. यावेळी २ सप्टेंबर २०२२ रोजी भाजपा पदाधिकारी आशीष कुलकर्णी यांच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे पक्षांतरांच्या चर्चांना बळ मिळालं होतं. मात्र, ही अनौपचारिक भेट होती, या भेटीत कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असा खुलासा चव्हाणांनी केला होता.

हेही वाचा – अशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण; फडणवीसांच्या भेटीमुळे चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

५ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र, अशोक चव्हाणांनी या पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा मुंबई दौऱ्यावर येणार होते, त्यामुळे अशोक चव्हाण गैरहजर राहिले असल्याची चर्चा होती.

हेही वाचा – काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, पक्षांतराच्या राजकीय चर्चांना उधाण

एवढंच नव्हे तर शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या सर्व निर्णयांना केराची टोपली दाखवली जात असताना अशोक चव्हाण यांच्या योजनेला मात्र ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यामुळे अशोक चव्हाणांवर सरकार मेहरबान असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या.

हेही वाचा – शिंदे गटाकडून अशोक चव्हाणांच्या योजनेला मंजुरी, पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

महापुरुषांच्या अपमानप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मौन बाळगले होते. महामोर्चाच्या निमित्ताने झालेल्या बैठकांमध्येही त्यांनी दांडी मारली. तसंच, महामोर्चालाही ते कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेसविरोधातील त्यांची नाराजी उघड होत असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा – महामोर्चात काँग्रेस नेते अशोक चव्हाण सहभागी होणार नाहीत, वाचा काय आहे कारण…

त्यामुळे, काँग्रेस आणि भाजपा यांचे सूत जुळणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाने त्यांचा आदर्श घोटाळा पुन्हा बाहेर काढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

First Published on: January 23, 2023 12:22 PM
Exit mobile version