काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, पक्षांतराच्या राजकीय चर्चांना उधाण

ASHOK CHAVAN

मुंबई – भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. यानंतर भेट झाली पण राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण दोघांनी दिले. चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच राहतील, असे स्पष्ट केले होते. दरम्यान अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला दांडी मारल्यामुळे पुन्हा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.

आज माजी मंत्री जितू पटवारी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज 1 वाजता पत्रकार परिषद बोलावली होती. काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची पत्रकार परिषद होती. मात्र, या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाण आलेच नाही. पत्रकार परिषदेत नाव असताना सुद्धा चव्हाण गैरहजर राहिले. मुंबईमध्ये आज अमित शहा यांचा दौरा असल्याने ते पत्रकार परिषदमध्ये गैरहजर असल्याची चर्चा सुरू आहे.

यामुळे होत आहे चर्चा –

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहांचा मुंबई दौरा आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे मत व्यक्त करत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांन अनुपस्थिती दर्शवल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली आहे.