घरमहाराष्ट्रअशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण; फडणवीसांच्या भेटीमुळे चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

अशोक चव्हाणांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण; फडणवीसांच्या भेटीमुळे चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

Subscribe

गेल्या काही महिन्यांतील कॉंग्रेस अंतर्गत घडामोडी लक्षात घेता अशोक  चव्हाण कॉंग्रेसमध्येच राहतील, याची खात्री नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  झालेल्या भेटीमुळे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराच्या चर्चेने शुक्रवारी जोर पकडला होता. मात्र, खुद्द चव्हाण यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. तर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भातील वृत्त खोडसाळपणाचे असून त्याचा इन्कार केला आहे.

अशोक चव्हाण यांनी गुरुवारी उशीरा  भाजपचे पदाधिकारी आशीष कुलकर्णी यांच्या वरळीतील निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यावेळी तेथे चव्हाण यांची फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे आज राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, गणपती दर्शनासाठी केवळ योगायोगाने आम्ही एकाच ठिकाणी होतो तेव्हा उभ्या-उभ्या भेट झाली, असा दावा दोघांनी केला. परंतु गेल्या काही महिन्यांतील कॉंग्रेस अंतर्गत घडामोडी लक्षात घेता अशोक  चव्हाण कॉंग्रेसमध्येच राहतील, याची खात्री नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

आपला राजकीय श्रीगणेशा शिवसेनेतून केलेले आशीष कुलकर्णी हे फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कुलकर्णी हे कॉंग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती होते. मात्र, त्यानंतर कुलकर्णी हे भाजपमध्ये आले. त्यामुळे फडणवीस आणि चव्हाण यांना एकत्र आणण्यात कुलकर्णी हे महत्वाचा दुवा ठरले आहेत.
विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या पराभवाची पक्षाने चौकशी केली. हंडोरे यांच्या पराभवाच्या संशयाची सुई अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अशोक चव्हाण सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे चव्हाण साध्य संशयाच्या भोवऱ्यात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना  आमच्या पाठिशी काही अदृश्य  हात असल्याचे सूचक विधान केले होते. तेव्हापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, चव्हाण यांनी सातत्याने मी काँग्रेस सोडणार या केवळ वावडया आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही, असे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. आताही चव्हाण यांनी मी फडणवीसांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. रविवारी दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा असून मी शनिवारी त्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी आज  स्पष्ट केले.

काँग्रेसला खिंडार पडणार ही अफवा : नाना पटोले
काँग्रेसचे आमदार  भाजपत प्रवेश करणार. काँग्रेसला खिंडार पडणार, या केवळ अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. केवळ जनतेची  दिशाभूल करण्यासाठी या वावडया उठविण्यात येत असल्याचे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्याबाबतचे वृत्त  दिशाभूल करणारे : बाळासाहेब थोरात
अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे आणि  लोकांची दिशाभूल करणारे आहे.  चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसार  माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात  चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -