नाशिक महासभेत शिवसेनेच्या घोषणा, ‘पळपुट्या भाजपचा धिक्कार असो’

नाशिक महासभेत शिवसेनेच्या घोषणा, ‘पळपुट्या भाजपचा धिक्कार असो’

Shivsena Bjp

राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी नाशिक महापालिकेत मात्र शिवसेनेने आपला बाणा सोडलेला नाही. करवाढीच्या विरोधात सादर केलेली लक्षवेधी दाखलमान्य करुन न घेतल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्यांनी ‘नहीं चलेगी नहीं चलेगी दादागीरी नहीं चलेगी’, ‘पळपुट्या भाजपचा धिक्कार असो‘, अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी महापौरांनी नेहमीच्या ‘स्टाईल’ने गोंधळाचा फायदा उचलत कोट्यवधींचे विषय विनाचर्चा मंजूर केले आणि महासभा गुंडाळली.

लक्षवेधीवर चर्चा होऊ न दिल्याने सभागृहात गदारोळ

शुक्रवारी २२ फेब्रुवारीला महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर महापौरांनी लगेचच विषय पत्रिकेतील विषय वाचनाचे आदेश दिले. प्रत्यक्षात विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी घरपट्टी आणि करयोग्य मूल्य वाढीच्या विरोधात लक्षवेधी सूचना सादर केलेली होती. त्यावर चर्चा होऊ न दिल्याने शिवसेनेच्या सदस्यांसह राष्ट्रवादीचे गटनेते शाहू खैरे, अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा आणि अन्य नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. सभागृहात गदारोळ सुरु होताच महापौरांनी विषपत्रीकेवरील विषयांना मंजूरी देत सभा अटोपती घेतली.

नगरसचिवांची खुर्ची केली उलटी

सभेनंतर संतप्त झालेल्या विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नगरसचिव विभागात धाव घेतली. मात्र नगरसचिव जागेवर नसल्याने त्यांची खुर्ची उलटी करीत पळपुट्या भाजपचा धिक्कार असो, चुकीची कामे काम करणार्‍या नगरसचिवांचा धिक्कार असो अशा घोषणा देत खुर्चीला निषेधाचे पत्र लावले आहे.


हेही वाचा – युतीने गणीत बिघडवल्याने नाशकात आता तिसर्‍या आघाडीची शक्यता

हेही वाचा – अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही अट मान्य नसेल तर युती तोडा – रामदास कदम


 

First Published on: February 22, 2019 2:36 PM
Exit mobile version