२०१४मध्ये भाजपचा मुख्यमंत्री २०१९ ला युतीचा असणार

eknath khadse
भाजप नेते एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण

शिवसेना आणि भाजप यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटत आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी एकनाथ खडसे यांनी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडल्याची घोषणा केली होती, त्यानंतर खडसे यांनी सोमवारी युतीची घोषणा झाल्यानंतर २०१४ साली अनुकूल वातावरण होते म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, मात्र २०१९मध्ये युतीचा मुख्यमंत्री असेल, असे सूचक विधान केले.

२०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळी परिस्थिती अनुकूल राहिली नाही. त्यामुळे शिवसेनेबरोबर युती झाली ते बरेच झाले. गेल्यावेळी भाजप-सेनेची युती न झाल्याने भाजपचा मुख्यमंत्री झाला. मात्र, आता युतीचा मुख्यमंत्री होईल, असे खडसे म्हणाले.

वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमधील संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला शिवसेना आणि भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, एकनाथ खडसे यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजपने शिवसेनेची मर्जी राखण्यासाठी जाणुनबूजून खडसे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवल्याची चर्चा होती. याशिवाय, कार्यक्रमाला उपस्थित असणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनाही उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतर पहिल्या रांगेतून काढता पाय घ्यावा लागला होता.