घरमहाराष्ट्रनाशिकयुतीने गणीत बिघडवल्याने नाशकात आता तिसर्‍या आघाडीची शक्यता

युतीने गणीत बिघडवल्याने नाशकात आता तिसर्‍या आघाडीची शक्यता

Subscribe

युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाल्याने भारतीय जनता पार्टीतील काही बड्या इच्छुकांची कोंडी झाली आहे. युतीच्या गणिताने विरोधकांचीही समीकरणे बदलली असून त्यांनीदेखील आता आपल्याच पक्षातील प्रबळ दावेदारांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामत: अन्य पक्षाचेही दरवाजे या अस्वस्थ मंडळींसाठी बंद झाल्याचे चित्र आहे.

युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाल्याने भारतीय जनता पार्टीतील काही बड्या इच्छुकांची कोंडी झाली आहे. युतीच्या गणिताने विरोधकांचीही समीकरणे बदलली असून त्यांनीदेखील आता आपल्याच पक्षातील प्रबळ दावेदारांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामत: अन्य पक्षाचेही दरवाजे या अस्वस्थ मंडळींसाठी बंद झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तिसर्‍या आघाडीची चाचपणी सुरू झाली असून मंगळवारी, १९ फेब्रुवारीला अस्वस्थ नेत्यांनी जिल्ह्यातील काही जुन्या जाणत्यांचे सल्लेही घेतल्याचे सूत्रांकडून समजते. लोकसभेसाठी तिसर्‍या आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास विधानसभा निवडणुकीला त्याची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती करणार नाही अशा वल्गना उद्धव ठाकरे यांनी वारंवार केल्याने यंदा लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या वाढली होती. परंतु, युतीची घोषणा झाल्याने या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी केली असून त्यांनी प्रचार कार्यालाही सुरुवात केली आहे. वैयक्तिक गाठीभेठी आणि कार्यक्रमांना उपस्थिती यावर त्यांनी गेल्या वर्षापासून भर दिला. मराठा समाजाच्या आंदोलनातील सक्रीय सहभागही त्यांच्या इच्छुक असणार्‍यांवर शिक्कामोर्तब करीत होता. विशेष म्हणजे या आंदोलनात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांची सक्षम साथ लाभली. युती झाली नसती तर भाजपच्या उमेदवारीची माळ कोकाटेंच्याच गळ्यात पडेल असे निश्चित मानले जात होते. परंतु युतीच्या घोषणनंतर आता कोकाटे यांना एकतर युतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल किंवा अन्य मार्गाचा स्वीकार करावा लागेल. कोकाटे यांना छगन भुजबळ यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जात होते. कालांतराने कोकाटेंनी भुजबळांशी जुळवून घेतले. त्यामागेही लोकसभेची गणिते असल्याचे बोलले गेले. मात्र, युतीच्या घोषणेनंतर आता भुजबळ कुटुंबाकडेच उमेदवारीची सूत्रे जाण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

विशेषत: युतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी छगन भुजबळ हाच योग्य पर्याय असल्याचे अहवाल पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ अशीच टस्सर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोकाटेंनी उमेदवारी करण्याचे ठरविल्यास तिसर्‍या आघाडीच्या पर्यायाचा उगम होऊ शकतो. नारायण राणे यांचे समर्थक म्हणूनही कोकाटे यांची ओळख आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष, मराठा क्रांती मोर्चा, स्वाभीमानी शेतकरी संघटना आदींची मोट बांधत ही आघाडी कार्यरत होऊ शकते. कोकाटे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्याने त्याचाही फायदा ते आघाडीसाठी करू शकतात. शिवाय युती आणि आघाडीतील दुखावलेले घटक या तिसर्‍या पर्यायाकडे आकृष्ट होऊ शकतात.

माणिकराव म्हणतात, कुछ भी हो सकता है !

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याशी ‘आपलं महानगर’ने संपर्क साधला असता त्यांनी ‘आगे कुछ भी हो सकता है’ अशी सूचक प्रतिक्रीया दिली. अजून उमेदवारी निश्चित नाही, जागा वाटपही झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात काहीही होऊ शकते, असे सांगतानाच निवडणूक लढविणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विधानसभेतही संधीचा वांधा

माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीऐवजी विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले तरी सिन्नर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे करीत आहेत. विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने कोकाटे हे लोकसभा निवडणुकीत नशिब आजमावतीलच असे बोलले जात आहे. दुसरीकडे दिंडोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे असले तरीही महापौर रंजना भानसी यांच्याही नावाची चर्चा उमेदवारीसाठी सध्या सुरू आहे.

विधानसभेसाठी वसंत गितेंची कोंडी

विधानसभा निवडणुकीत ५०-५० असा फार्म्युला युतीकडून अवलंबला जाणार आहे. अशा परिस्थितीत विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गिते यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे. गिते हे मध्य नाशिक मतदार संघातून इच्छुक असून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आमदार देवयानी फरांदे करतात. युतीमुळे शिवसेनेला ही जागा सुटण्याची शक्यता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत गिते राष्ट्रवादीचा मार्ग धरतात की तिसर्‍या आघाडीचा पर्याय स्वीकारता हे बघणे औत्सुक्याचे होणार आहे.

युतीने गणीत बिघडवल्याने नाशकात आता तिसर्‍या आघाडीची शक्यता
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -