हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते. यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिलपासून सुरू होत असून 17 एप्रिलपर्यंत समाप्त होणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते. दुर्गादेवी ही सुख, समृद्धी, शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते. जे भाविक श्रद्धेने देवीची पूजा करतात त्यांवर देवीची अखंड कृपा असते.
पौराणिक मान्यतेनुसार, वाघ किंवा सिंहाला देवीचे वाहन मानले जाते. अनेक फोटो आणि मूर्तीमध्ये वाघ किंवा सिंहाला आपण देवीचे वाहन म्हणून पाहते. परंतु नवरात्रीच्या काळात जेव्हा देवीचे आगमन होते त्यावेळी देवीचे वाहन बदलते असं म्हटलं जातं. देवी भागवत ग्रंथानुसार, नवरात्रीत देवी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते.
वारानुसार निश्चित केले जाते देवीचे वाहन
देवी कोणत्या वाहनावरुन येणार आहे हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या वारानुसार निश्चित केले जाते. ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी किंवा सोमवारी येतो त्यावेळी देवी हत्तीवर बसून येते. ज्यावेळी नवरात्र मंगळवारी किंवा शनिवारी येते त्यावेळी देवी घोड्यावरुन येते असं समजलं जातं. तसेच ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवार किंवा शुक्रवारी असतो त्यावेळी देवी डोलीमध्ये बसून येते. बुधवारी आलेल्या नवरात्रीत देवी बोटीवर बसून येते. नवरात्रीमध्ये देवी कोणत्या वाहनावर बसून येते यामुळे येणारे वर्ष शुभ असेल की अशुभ याचा अनुमान लावला जातो.
यंदा घोड्यावर स्वार होणार देवी दुर्गा
यंदा चैत्र नवरात्रीचा पहिल्या दिवशी मंगळवार असल्याने देवी घोड्यावर बसून येणार आहे. देवीचं घोड्यावरुन येणं फारसं शुभ मानलं जात नाही. ज्यावेळी देवी घोड्यावर स्वार होऊन येते त्यावर्षी समाजात अस्थिरता, तणाव, मोठ्या दुर्घटना, भूकंप, युद्ध यांसारखी संकटं निर्माण होणार असल्याचं म्हटलं जातं.