घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : निकाल तुम्हाला आधीच माहीत आहे का? सुषमा...

Lok Sabha Election 2024 : निकाल तुम्हाला आधीच माहीत आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

Lok Sabha2024 : अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिलला मतदान होणार आहे. मविआचे येथील उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना - उद्धव गटाच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुती, भाजपा आणि महायुतीच्या येथील उमेदवार तसेच विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

अमरावती : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सगळेच राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचार सभांनी वेग धरला आहे. स्टार प्रचारक आपापल्या उमेदवारांसाठी जागोजागी जोरदार सभा घेताना दिसत आहेत. अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिलला मतदान होणार आहे. मविआचे येथील उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना – उद्धव गटाच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुती, भाजपा आणि महायुतीच्या येथील उमेदवार तसेच विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (LokSabha election 2024 sushma andhare criticises bjp)

तुम्हाला निकाल आधीच माहीत आहे म्हणून उमेदवारी दिली का?

वास्तविक, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा निकाल येणे अजून बाकी आहे. आणि असे असतानाही भाजपाने तेथून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीनंतर लगोलग त्यांचा पक्षप्रवेशही झाला. या घटनाक्रमावर अंधारे यांनी टीका केली आहे. मुळात अमरावतीची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागला नव्हता, तरीही त्यांना कशी उमेदवारी देण्यात आली, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे, त्यांना भाजपासारखी महाशक्ती उमेदवारी देते, याचा अर्थ काय? न्यायालयात काय निकाल लागणार, हे भाजपाला माहीत आहे का, अशा शब्दात अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. न्यायालयाचा निकाल काय भाजपाकडे राखीव आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. बरं, एवढं करून जो उमेदवार दिला तो देखील डुप्लिकेट, ना ते बाबासाहेबांचे अनुयायी ना कट्टर हिंदुत्ववादी, असं म्हणत नवनीत राणांवरही टीका केली. दरम्यान, राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल 1 एप्रिलला लागणार होता, मात्र अद्याप तो लागलेला नाही, त्यामुळे अजनूही राणा यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आणि त्यावरूनच राणा यांच्यावर टीका केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : एनसीपी-एसपीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल, शिंदे गटाला निर्देश…

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण काय ?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायलयाने 8 जून 2021 रोजी रद्द केलं असून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्याता आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाचा निर्णय लवकरच लागेल, अशी आशा आहे. (LokSabha election 2024 sushma andhare criticises bjp)

- Advertisement -

महायुतीतूनच राणा यांना विरोध

नवनीत राणा यांच्या विरोधात महायुतीतीलच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडून अमरावतीमध्ये उमेदवार देण्यात आला आहे. अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांचा आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब प्रहार पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. माझ्यासोबत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते राहतील. काही प्रमाणात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील माझ्यासाठी काम करतील, असा दावा दिनेश बूब यांनी केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: आमच्या तर वाघाच्या गर्जना; ते नारा द्यायच्या लायकीचे…; राऊतांचा हल्लाबोल

रश्मी बर्वे यांचा निकालही प्रलंबित

कॉंग्रेसच्या रामटेकच्या लोकसभा उमेदवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. यामुळे त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला. याविरुद्ध बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. सोमवारच्या सुनावणीत बर्वे यांच्या याचिकेत त्रुटी आढळल्याने त्यांना मंगळवारी सकाळी सुधारित याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाने सूचना केल्या आहेत. या प्रकरणी बुधवार, ३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील बर्वे यांच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांची उमेदवारी रद्द होणार हे माहीत असतानाही कॉंग्रेसने बर्वे यांना उमेदवारी का दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (LokSabha election 2024 sushma andhare criticises bjp)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -