Friday, May 3, 2024
घरमानिनीRelationshipवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें । आणि एथ देह तंव असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥
तर बाबारे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत, तितक्या फक्त देहाच्या सुखाकरिता आहेत आणि तो देह तर या मृत्युलोकी काळाच्या तोंडात पडलेला आहे!
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकीचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥
अरे ! या मृत्युलोकाच्या शेवटच्या मनुष्यरूपी बाजारात दुःखरूपी माल भरलेला असून मरणरूपी माप चालले आहे. त्या ठिकाणी मनुष्यरूपाने येणे झाले आहे.
आतां सुखेंसि जीविता । कैंची ग्राहिकी किजेल पंडुसुता । काय रांखोंडी फुंकितां । दीपु लागे? ॥
तर हे पंडुसुता अशा दुःखरूपी बाजारात जीवाला सुख होईल अशी कोणती वस्तू खरेदी करिता येईल? हे पाहा विस्तव विझून गेल्यावर राहिलेली राख फुंकीत बसले तर त्यापासून दिवा लागेल का?
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी । तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥
अरे, विषाचे कांदे वाटून ते पिळावयाचे व त्यांचा रस काढल्यावर त्याला अमृत असे म्हणावयाचे व ते पिऊन ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा करावयाची,
तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥
त्याप्रमाणे या विषयापासून होणारे जे सुख, ते केवळ महत् दुःख आहे. परंतु जे अज्ञानी आहेत त्यांना त्यांचे सेवन केल्याशिवाय राहवत नाही.
कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकीचें भलें । आहे आघवें ॥
किंवा पायाला झालेल्या जखमेवर आपले डोके तोडून बांधणे जितके चांगले, तितक्याच या मृत्युलोकांतील गोष्टी चांगल्या आहेत.

- Advertisment -

Manini