घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जें ॥
जे पृथ्वीवरील देवच, जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार, ज्यांच्या योगाने सर्व तीर्थाचे दैव उदय पावले आहे.
जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी । जयांचिये दिठीचिया उत्संगीं । मंगळ वाढे ॥
ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा अखंड वास, जे वेदाची बळकट कवचे व ज्यांच्या दृष्टीच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धी होते.
जयांचिये आस्थेचेनि वोलें । सत्कर्म पाल्हाळीं गेलें । संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥
ज्यांच्या आस्थारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसाद झाला व ज्यांच्या निश्चयाने सत्य जिवंत राहिले.
जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें । म्हणौनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिप्रीती ॥
ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून त्यांच्या प्रीतीस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला.
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोडविली वक्ष्यस्थळाची वाखती । चरणरजां ॥
मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली व कौस्तुभमणी गळ्यातून काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या चरणरजांच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली.
आझुनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागी ॥
हे नरेंद्रा, माझा शांतपणाचा लौकिक कायम राहण्याकरिता ज्यांच्या पावलाची खूण मी अजून आपल्या हृदयावर बाळगली आहे.
जयांचा कोप सुभटा । काळाग्नि रुद्राचा वसौटा । जयांचे प्रसादी फुकटा । जोडती सिद्धी ॥
हे महावीरा, ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान होय व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धी प्राप्त होतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -