Sunday, April 28, 2024
घरमानिनीपैशांपेक्षा बालरुग्णांच्या जीवनात हास्य फुलवण्याची पॅशन मोठी

पैशांपेक्षा बालरुग्णांच्या जीवनात हास्य फुलवण्याची पॅशन मोठी

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून डॉ. भोसले एचआयव्हीग्रस्त लहान मुलांवर उपचार करण्याचं उल्लेखनीय काम करीत आहेत. समाजोपयोगी कामांमध्येही त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. समाजासाठी आदर्शवत ठरणार्‍या डॉ. वर्षा भोसले यांनी माय महानगरच्या मानिनीसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

प्रत्येक क्षेत्रात आव्हानं तर असतातच, पण आपल्या कामावर आपली निष्ठा असेल, तर त्या आव्हानांचा सामना करण्यातूनही वेगळा आनंद आणि समाधान मिळतं. वैद्यकीय क्षेत्रात कधी, कुठल्या क्षणी आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जावं लागेल याची काहीच शाश्वती नसते. एकवेळ सज्ञान व्यक्तीवर उपचार करणं सोपं, पण रुग्ण जर अबोध बालक असतील, तर ते आव्हान आणखीनच कठीण होऊन बसतं, मात्र दररोज अशा शेकडो लहानग्या रुग्णांवर उपचार करणार्‍या बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा भोसले हे आव्हान लिलया पेलतात. मागील अनेक वर्षांपासून डॉ. भोसले एचआयव्हीग्रस्त लहान मुलांवर उपचार करण्याचं उल्लेखनीय काम करीत आहेत. समाजोपयोगी कामांमध्येही त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे. समाजासाठी आदर्शवत ठरणार्‍या डॉ. वर्षा भोसले यांनी माय महानगरच्या मानिनीसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

डॉ. वर्षा भासले यांनी २००९ साली के. ई. एम. रुग्णालयातून एम. डी. पीडियाट्रिक ही पदवी मिळवत वैद्यकीय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. या संपूर्ण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. खासकरून लहानग्यांनी अनेक गोष्टी शिकविल्या, असंही डॉ. वर्षा भोसले सांगतात. एमडी झाल्यानंतर प्रॅक्टिस करतानाच आपल्या शिक्षणाचा समाजासाठी जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा विचार सुरू झाला होता. जिथं कुणीच पोहचू शकत नाही तिथं आपण आपल्या ज्ञानाच्या जोरावर पोहचायचं हा निश्चय मनाशी पक्का केला होता. त्याच अनुषंगाने प्रोफेशन आणि सामाजिक जबाबदारी या दोहोंची सांगड घालत कमर्शियल पीडियाट्रिक प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. वर्षा भोसले या लहान मुलांचा एन. आय, सी, यु, देखील चालवतात. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डॉ. वर्षा यांनी एचआयव्हीमध्ये फेलोशीप मिळविली. जिथं नवजात बालकापासून ते एक महिन्याच्या बालकांवर उपचार केले जातात. माझं क्षेत्र फार मजेशीर आहे. लहान मुलांकडे पाहिल्यावर केलेल्या कामाचा आनंद मिळतो, असं डॉ. वर्षा भोसले सांगतात.

- Advertisement -

२००५ साली असाच एक एन, आय. सी, यु त्यांनी मालाडमध्ये सुरू केला. साधारण 2006च्या आसपास एका संस्थेच्या माध्यमातून बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या एड्स कंट्रोल प्रोजेक्टवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तिथं बारबालांच्या हेल्थ आणि एकूणच एड्स कंट्रोल प्रोग्रॅमवर काम करताना डॉ. वर्षा यांच्या लक्षात आलं की लहान मुलांमध्ये आढळणारा एड्स हा बहुतांश वेळा जन्मतःच असतो किंवा काही मुलांमध्ये तो लैंगिक छळाच्या माध्यमातून आलेला असतो. लहान मुलांना एचआयव्हीची लागण होण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असल्याचं डॉ. वर्षा सांगतात, मात्र लहान मुलांच्या एड्ससाठी काम करणार्‍या संस्था या अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारी वैद्यकीय किंवा आर्थिक मदतसुद्धा कमी प्रमाणात असते, पण मग हे सगळं असं असताना या सगळ्यात शासन कुठे आहे? यावर डॉ. वर्षा म्हणाल्या की, महाराष्ट्रात अजूनही असे अनेक ग्रामीण भाग आणि आदिवासी पाडे आहेत जिथे अजूनही शासन पोहचत नाही किंवा तिथल्या नागरिकांना गरजेच्या वेळी शासनाकडून वैद्यकीय उपचार मिळत नाहीत.

- Advertisement -

समाजकार्यात झोकून देत एचआयव्हीग्रस्त लहानग्यांवर उपचार करणार्‍या बालरोगतज्ज्ञ- डॉ. वर्षा भोसले

अशातच डॉ. वर्षा यांचं आणखी एक उल्लेखनीय कार्य म्हणजे संजीवनी छावणी आणि श्रमजीवी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक मुलांवर उपचार केले आहेत. प्रामुख्याने ठाणे आणि पालघर भागातील आदिवासी पाड्यांमध्ये जी लहान मुलं किंवा इतर नागरिक राहतात त्यांच्यापर्यंत डॉ. वर्षा भोसले आणि त्यांचे पती डॉ. आशिष भोसले वैद्यकीय उपचार पोहचवतात. या आदिवासी पाड्यांमध्ये तिथल्या लहान मुलांवर उपचार करतानासुद्धा एक डॉक्टर म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या अशा की त्या ठिकाणी लहान मुलांना त्यांच्या शाळांमध्ये शासनाकडून जो पोषण आहार मिळतो तो कमी दर्जाचा असतो. अर्धवट शिजलेले अन्नपदार्थ, त्यात कोणत्याच प्रकारचे पोषण नाही. त्यामुळे अशा भागांमध्ये भूकबळीचं प्रमाणसुद्धा अधिक आहे. त्याचबरोबर प्रत्येक शासकीय मदत ही केवळ कागदावरच असते, प्रत्यक्षात नाही. त्यामुळे शासनाने कायदे करीत असताना किंवा मदत करीत असताना ती नागरिकांपर्यंत पोहचते की नाही याचाही पाठपुरावा करावा. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात आला, पण एका बाजूला मात्र भारतातच लहान मुलांचा भूकबळी जातो. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असं म्हणत डॉ. वर्षा भोसले यांनी खंत व्यक्त केली.

अशाच मुलांच्या पालन-पोषणाचं काम डॉ. वर्षा अव्याहतपणे करीत आहेत. लहान मुलांसाठी कॅम्प आयोजित करणं, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय उपचार करणं, त्याचबरोबर पालक आणि मुलांचे समुपदेशन करणं यासारखं उल्लेखनीय कार्य डॉ. वर्षा भोसले करीत आहेत. असं म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती निरपेक्ष भावनेने एखादं समाजहिताचं काम करीत असते तेव्हा मदत करणारे हातसुद्धा असतात. अशाच प्रकारे डॉ. वर्षा यांनासुद्धा त्यांच्या या कामात अनेक डॉक्टरांच्या मदतीचे हात मिळाले. सोबतच विवेक पंडित यांचं मार्गदर्शन आणि मदतही त्यांना मिळाल्याचं त्या सांगतात.

डॉ. वर्षा भोसले यांचं कार्य अफाट आहे. त्यांनी जी झेप घेतली ती फार मोठी आहे. समाजाप्रति असलेली बांधिलकी जपली पाहिजे हे वाक्य त्या स्वतःच्या कामातून शब्दशः खरं करून दाखवत आहेत. एवढं काम करूनही त्यांना आणखी बरंच काही करण्याचा ध्यास आहे. एक व्यक्तीपासून डॉ. वर्षा भोसले होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण त्यांनी तो सहज पार केला. डॉ. वर्षा भोसले यांच्या सामाजिक कार्याचा आणि ज्ञानाचा उपयोग त्या समाजासाठी करीत राहो. डॉ. वर्षा भासले यांच्या या अतुलनीय कामाची दखल घेऊन २००८ साली त्यांना महापौर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini