Friday, April 26, 2024
घरमानिनीDiaryDiary : तो... देईल मला साथ! (भाग पहिला)

Diary : तो… देईल मला साथ! (भाग पहिला)

Subscribe

सांजवेळ म्हणजे तो आणि त्याला आवडणारा गरमागरम चहा! सांजवेळ म्हणजे चौपाटीवर घालवलेले त्याच्याबरोबरचे कित्येक सुंदर क्षण! सांजवेळ म्हणजे त्याच्यासोबत हातात हात घालून चाललेला कित्येक मैलाचा प्रवास! सांजवेळ म्हणजे त्याच्या घट्ट मिठीत राहून पाहीलेली भविष्याची अनेक स्वप्नं!  सांजवेळ म्हणजे सात जन्म एकमेकांसोबत राहणारी वचनं! सांजवेळ म्हणजे तो , मी आणि आमचं एकमेकांवरच नितांत प्रेम!
सांजवेळ म्हणजे त्याच्यासोबत घालवलेल्या सगळ्या सुंदर क्षणांची साक्षीदार,अशी ही सांजवेळ मला नेहमी हवीहवीशी वाटायची, ही सांजवेळ आमच्या नात्यातला एक नाजूक धागा होती, खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं ठिकाण, एखादी गोष्ट, एखादी वेळ खूप जवळची असते तशीच ही सांजवेळ ही आम्हा दोघांच्या मनाशी जोडली गेली होती.
जिच्या साक्षीने आम्ही भविष्याची अनेक स्वप्नं रंगवली होती.
पण अचानक एक दिवस तो मला एकटीला सोडून निघून गेला, तेव्हा पासून ही सांजवेळ नकोशी वाटू लागलेय.

तसा खूप कमी काळ आम्ही एकमेकांनसोबत घालवला, पण तरीही त्याच्या त्या क्षणीक सहवासाने माझं अख्ख आयुष्य व्यापून टाकलंय!
म्हणूनच ही सांजवेळ झाली की पुन्हा पुन्हा मला तोच आठवतो, छेऽ..छेऽ….आठवतो काय म्हणतेय मी,  खरंतर मी तर त्याला कधी विसरतच नाही!
.
.
असो..,
एव्हाना अशी एकटीच बडबडत असते मी, सगळे मला वेड्यात काढतात, वेडी म्हणतात.
पण मला त्या सगळ्यांना सांगायचंय, हो आहे मी वेडी! फक्त त्याच्यासाठी….!

- Advertisement -

मला अजूनही चांगलंच आठवतंय, दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी ही तो जिल्ह्यातल्या शर्यतीत पहिला आला होता, सलग पाच वर्ष शर्यतीत पहिला आला म्हणून गावात त्याचा खूप मोठ्ठा सत्कार झाला, त्या दिवशी गावातल्या सगळ्यांच्या ओठांवर फक्त त्याचंच कौतुक चालू होतं, मी सुद्धा खूप आनंदात होते.
तशी आमची त्या वेळी फारशी ओळख नव्हती, पण खरं सांगू का, मला तर तो खूप आधी पासून आवडू लागला होता, त्याचा तो डाॅशिंग लूक, आवाजातला दमदारपणा, प्रामाणिकपणा, नेहमी सगळ्यांच्या मदतीला येणारा प्रेमळ स्वभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं आर्मीत जायचं स्वप्न!!
व्हा…. सगळं किती सुंदर!
एखाद्या मुलीच्या स्वप्नातला राजकुमार जसा असावा, अगदी तसाच होता तो! त्यामुळे मी तर तेव्हाच ठरवलं होतं, नवरा असावा तर असाच!

त्याचे आई-बाबा तो लहान असतानाच देवा घरी गेले , त्याचा सांभाळ त्याच्या आजीने केला, त्याच सगळं शिक्षण शहरातल्या बोर्डींग मध्ये झालं, वर्षातले एक-दोन वेळा तो गावी यायचा तेव्हा क्वचित आमची नजरानजर व्हायची, तो गावी आला आहे हे कळलं की , मी त्याच्या आजीला भेटण्याच्या बहाण्याने मुद्दाम त्याच्या घरी जायचे, त्याने माझ्याकडे एकदा पाहावं, माझ्याशी बोलावं, माझ्या नावाने एखादी हाक मला मारावी असं मला नेहमी वाटायचं, त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कित्येकदा केलेले ते बालिश प्रयत्न आठवले की आता माझी मलाच लाज वाटते!

- Advertisement -

तशी मी त्यावेळी १८-१९ वयाची असेन, दोन वेण्या घालून केसात चाफ्याची दोन फुलं माळून, याची-त्याची टिंगल करत अख्ख्या गावभर उनाडक्या करत फिरायचे.

पण तो !
त्याच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक होता,
तो खूप शिकलेला हुशार , देखणा, रूबाबदार , आर्मीत जायचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलेला मुलगा!

अन् मी! गावाकडची, मोजक शिकलेली,
खोडकर ,बावळट , स्वत:च्या धुंदीत जगणारी मुलगी!

किती फरक होता ना आमच्यात!
आणि त्यादिवशी तर गंमतच झाली, मी अन् गावातली पोरं दामू अण्णा च्या झाडावर चढून कैऱ्या खात होतो.
अचानक तिथे तो आणि दामू अण्णा आले, दामू अण्णा ला पाहून सगळी पोरं झपाझप उड्या मारून पळून गेली.
पण त्याक्षणी माझी तर वेगळीच पंचायत झाली, खाली उतरावं तर त्याच्या समोर मला दामू अण्णा चा ओरडा खावा लागणार म्हणून मी झाडावरच बसून राहिले, थोड्या वेळाने दामू अण्णा निघून गेले, तेव्हा तो झाडाजवळ येऊन म्हणाला, “कोण आहे झाडावर, खाली या मी अण्णाला घरी पाठवलंय”
त्याचं हे बोलणं ऐकून मी खाली आले, अन् खाली मान घालून काढता पाय घेत होते इतक्यात मागुन त्याने मला आवाज दिलास,
“शालिनी ना तू ? ”
“हो!, तुला कसं माहित?” मी विचारलं.
“हल्ली माझ्या घरी आजीला भेटायला येतेस ना तू, म्हणून माहितेय मला!”
“म्हणजे तु मला ओळखतोस?” मी लाजत हा प्रश्न विचारला.
“हो गं, त्यादिवशी तू ते लाडू आणून दिले होतेस ना, ते खूप छान झाले होते.”
“तुला आवडले?”
“म्हणजे काय, आवडणारच ना, तू बनवले होतेस ना?”
“हो..हो..मीच बनवले होते”
“मग पुन्हा बनवल्यावर पण देशील आणून?”
“हो.. नक्की देईन”
असं म्हणत मी घरी परतले, पण कसलं काय ते लाडू तर आईने बनवले होते, मी उगाच खोटं बोलले, पण आता त्याला आवडतात म्हंटल्यावर आईकडून कसेबसे शिकून घेतले.

मग काय मलाही तेवढंच निमित्त हवं होतं, त्याला भेटण्याचं, त्याच्याशी बोलण्याचं, त्याच्याशी मैत्री करण्याचं आणि अखेर माझ्या या अथक प्रयत्नांनंतर आमची मैत्री झालीच!

क्रमश:

- Advertisment -

Manini