Saturday, April 27, 2024
घरमानिनीDiaryDiary : तो… देईल मला साथ! (भाग दुसरा)

Diary : तो… देईल मला साथ! (भाग दुसरा)

Subscribe

आमचं बोलणं वाढत गेलं, ओळख वाढतं गेली, भेटीगाठी ही वाढत गेल्या, मन जुळू लागली.
हळूहळू या सगळ्याचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं, पण फक्त आता कुणीतरी पुढाकार घेऊन प्रेमाची कबुली देणं बाकी होतं, मी तर मनाशी पक्कं ठरवलं होतं, जो पर्यंत तो स्वत:हून प्रेमाची कबुली देत नाहीस तो पर्यंत मी काहीच बोलणार नाही!
आणि अशातच अचानक एक दिवस माझ्या घरी माझ्या लग्नाची कुरबुर सुरू झाली. हे सगळं जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा किती अस्वस्थ झाला होता तो, कळत-नकळत त्याची होणारी चिडचिड सगळं लक्षात येत होतं माझ्या!  पण मी वाट पाहत होते त्याच्या व्यक्त होण्याची, आणि अखेर तो दिवस आलाच!

त्यादिवशी समुद्र किनारी त्याने मला भेटायला बोलवलं होत, मी गेले त्याच्या समोर जाऊन उभी राहिले.
अचानक त्याने अथांग समुद्रासमोर गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला आणि म्हणाला..,
“शालिनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझ्याशी लग्न करशील?”
त्याक्षणी त्याच्या त्या हळव्या प्रश्नावर हसावं की रडावं हेच सुचेनासं झालं होतं,
मग मी ही व्यक्त झाले..,”हो अर्जुन, माझं ही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.”
त्याक्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी ही पुन्हा नव्याने सुखावले होते.
सांजवेळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने मी त्याला होकार दिला , खरंच तो दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.
त्याच दिवसापासून ह्या सांजवेळेने माझ्या मनात एक नवं घर तयार केलं होतं!

- Advertisement -

पुढे आर्मी भरतीसाठी तो काही दिवस बाहेर गावी गेला, तिकडून परत आल्यानंतर त्याच्या सिलेक्शन ची बातमी समजल्यावर, तो माझ्या घरी मला मागणी घालण्यासाठी आला, तो सगळ्याच गोष्टींत इतका हुशार, धाडसी, कर्तृत्ववान होता की, त्याला नकार देणं माझ्या घरच्यांसाठी शक्यच नव्हतं!
तो ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर आमचं लग्न करायचं ठरलं, ठरल्याप्रमाणे सगळं होत गेलं, तो ट्रेनिंग वरून परत आला , आमचं लग्न ही मोठ्या आनंदात पार पडलं!

लग्नानंतर आम्ही भविष्याची अनेक स्वप्नं रंगवली, आयुष्यभर असंच एकमेकांसोबत राहण्याची वचनं  दिली.
आणि अशातच एक दिवस त्याला  जाॅइनिंग लेटर आलं,
आम्ही दोघेही खूप आनंदात होता, एकीकडे त्याने लहानपणापासून पाहीलेलं स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद आणि दुसरीकडे मात्र एकमेकांपासून दूर जाण्याचं दु:ख!
पण हे सारं बाजूला ठेवून मी त्याला आनंदाने निरोप द्यायचा ठरवला.
त्याला आठवडा भरात कश्मिरला जाॅइन्ड व्हायचं होतं, मी त्याच्या जाण्याची सगळी तयारी केली,
तो निघताना माझा जीव खूप कासावीस झाला होता,
त्यावेळी तो मला धीर देत म्हणाला, “स्वत:ची आणि आजी ची काळजी घे, मी २-३ महिन्यात परत येईन आणि तुला माझ्या सोबत घेऊन जाईन”
मी ही स्वत:ला सावरुन त्याला आनंदाने निरोप दिला.

- Advertisement -

तिकडे गेल्यावर त्याला जसा वेळ मिळेल तसा तो पत्र पाठवायचा, पत्रांतून का होईना, आमचं बोलणं व्हायचं.
दूर असूनही आमचं नातं एकमेकांच्या हृदयाशी जोडलं गेलं होतं, हे त्या दूराव्यात ही जाणवत होतं.

प्रेमाचा खरा अर्थ काय? हे त्याक्षणी मला जाणवलं!
शरीराने जवळ असणाऱ्या नात्यांपेक्षा, शेकडो मैल दूर मनाने जवळ असणारं नातं किती लाख मोलाचं आहे, हे मला समजलं!
सगळं कसं एखाद्या सुंदर स्वप्ना सारखं घडत होतं,
हळूहळू एक-एक दिवस पुढे जात होता.

अशातच २ महीने होऊन गेले.
त्याचं पत्र आलं…, त्यात त्याने लिहिलं होत.
……….,”प्रिय शालू, मला आठवडाभरात सुट्टी मिळेल, मी तुला न्यायला येतोय, तू तयारी करून ठेव!”

त्याच्या सांगण्याप्रमाणे मी सगळी तयारी करून ठेवली,
त्याच्या येण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसेतसे माझ्या काळजाचे ठोके अजूनच वाढत होती, मला त्याला डोळे भरून पाहायचं होतं , खूप गमती-जमती सांगायच्या होत्या, खूप काही बोलायचं होतं!

पण ह्या नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, त्याच्या येण्याचा दिवस उजाडला, मी सकाळपासून सजूनधजून त्याच्या स्वागतासाठी, हातात ओवाळणीच ताट घेऊन उभांरठ्यात उभी होते,
कुठल्याही क्षणी तो येईल या भाबड्या आशेने, मी त्याच्या वाटेकडे डोळे लावले होते.
अचानक समोरच्या रस्त्यावरून एक मोठ्ठी गाडी आमच्या घराकडे येताना दिसली.
हो! तो आला असणार या विचाराने मी दोन पावलं पुढे सरकले, गाडी घरापाशी येऊन थांबली, लोकांची बरीच गर्दी जमा झाली.
त्या गर्दीत माझे डोळे त्यालाच शोधत होते, तेवढ्यात अचानक गाडीतून  तिरंग्यात गुडाळलेलं, रक्ताने माखलेले एक शरीर मला दिसलं!
ते शरीर कोणाचं होतं?
त्याचं? छे….छे… त्याचं कसं असेल, त्याने तर मला आयुष्यभर एकमेकांसोबत राहू असं वचन दिलं होतं ,
मग तो
तो असूच शकत नाही !
मी धावत धावत पुढे आले, आणि त्या देहाच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला,
रक्ताने माखलेला तिरंग्यात गुंडाळलेला माझा अर्जुन होता तो ! हे ज्याक्षणी मला समजलं, त्याक्षणी मी पूरती कोलमडून गेले, भूकंप होऊन धरतीला तडे जावे, तसे तडे माझ्या आयुष्याला, स्वप्नांना, काळजाला गेले होते.
काय करावं काहीच सुचेनास झालं होतं.
तो देशासाठी लढताना त्याला आलेल्या वीरमरणाचा अभिमान बाळगावा?की त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचं दु:ख बाळगावं?

पण त्याक्षणी मला एक गोष्ट मात्र नक्की समजली, ती म्हणजे आयुष्यातली सगळीच स्वप्न, सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तश्या कधीच होत नाहीत.

तो गेलास तेव्हा, मी अवघ्या वीस वर्षांची होते.
तो गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी अनेकदा माझ्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला, पण माझं मन त्याच्याशिवाय कशातच लागत नव्हतं,
माझं आख्ख तारुण्य मी त्याच्या आठवणींत काढलं!आयुष्यभर पुरेल एवढे त्याचं प्रेम आणि त्याच्या आठवणी माझ्यासोबत होत्या.

आता त्याला जाऊन जवळजवळ ३०-३५ वर्ष तरी झाले. माझं ही आता बरंच वय झालंय,
मी दिवस-रात्र त्याच्या फोटोशी बोलत असते म्हणून शेजारी-पाजारी मला वेडी म्हणतात.

जाऊदे त्यांना नाही समजायचं माझं प्रेम!

पण खरं सांगू का मला माहीतीये, तो या जगात नाहीये.
पण तरीही कुठुनतरी तो येईल या भाबड्या आशेने मी अजूनही जिवंत आहे !

मला ठाऊक आहे या जन्मात नाही.
निदान पुढच्या जन्मात तो देईल मला साथ!diary-army-man-love-story-part-2

- Advertisment -

Manini