Tuesday, May 21, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजही व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशूचेंही लाभो ॥
म्हणून, उत्तम कुल नसले अथवा जातीने अंत्यजही असला व पशूचाही देह प्राप्त झाला असला, तरी चालेल, पण भक्ती पाहिजे.
पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पावलिया मातें ॥
पाहा की नक्राने गजेंद्राला धरल्यावर त्याने दीनपणाने माझे स्मरण केले, त्या वेळेस तो मजप्रत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले.
अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनींही किरीटी । जन्मले जे ॥
अरे, जी अधमाहून अधम व जिचे नावदेखील घेणे उचित नव्हे, अशा पापयोनीत ज्यांनी जन्म घेतले आहेत.
ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड । परि माझ्या ठायीं दृढ । सर्वभावें ॥
जन्म तर अशा पापयोनीत व मूर्खपणाने तर केवळ दगड, परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे.
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥
ज्यांच्या वाणीने माझा नामोच्चार होतो. ज्यांची दृष्टी माझेच रूप पाहते व ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसरा विचारच नसतो.
माझिया कीर्तिविण । जयांचें रितें नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥
ज्यांचे कान माझा गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात (नेहमी ऐकतात) व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही.
जयांचें ज्ञान विषो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्‍हवीं मरण ॥
ज्यांच्या बुद्धीला विषय दिसत नसून मीच एकटा दिसतो, अशी स्थिती असली तरच ते जिवंत राहतात, नाही तर मरतात.

- Advertisment -

Manini