घरसंपादकीयदिन विशेषथोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

Subscribe

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतिदिन. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) व पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला. तिरुत्तनी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. उच्च शिक्षण चेन्नई येथील ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये झाले.

नंतर चेन्नईचे प्रेसिडेन्सी महाविद्यालय (१९०९-१६), म्हैसूर विद्यापीठ (१९१६-२१), कोलकाता विद्यापीठात (१९२१-३१) तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याचवेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर महाविद्यालयामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे (१९३१-३५) व बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९-४८) होते. तसेच लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते.

- Advertisement -

त्यांनी आपल्या लिखाणात शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली, ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. शिवाय त्यांनी नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करणही केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल, असे त्यांनी दाखवून दिले. धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही डॉ. राधाकृष्णन यांच्या परिशीलनाचा विषय होता.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते. शिक्षणाबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो, असे त्यांचे मत होते. अशा या महान तत्त्वचिंतकाचे १७ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -