दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांची समाजातील ओळख अधोरेखीत करण्यासाठी महिला दिन जगभऱात साजरा केला जातो. यादिवशी विविध कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. महिलांना भेटवस्तू दिल्या जातात. पण हा दिवस साजरा करण्यामागचे मूळ कारण काय हे तुम्हांला माहित आहे का? त्यासाठी आपल्याला महिला दिनाचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे.
कशी झाली जागतिक महिला दिनाची सुरुवात?

अमेरिकेत 1908 साली कामगार आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात पुरुषांच्या तुलनेत महिलांचेच प्रमाण सर्वाधिक होते. 15 हजार महिला कामगार न्यूयॉर्कच्या रस्त्यावर आपल्या हक्कांसाठी उतरल्या होत्या. कामाच्या वेळांमध्ये सवलत मिळावी आणि योग्य मानधनाबरोबरच मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी या महिला आंदोलकांची होती. महिलांच्या या आंदोलनामुळे कंपनी मालकांबरोबरच सरकारचेही धाबे दणाणले होते. महिलांच्या या एकजूटीपुढे सरकारही नमले. त्यानंतर वर्षभरानंतर 1909 मध्ये अमेरिकेतील सोशलिस्ट पार्टीने महिला दिनाची घोषणा केली.
अमेरिकेत 8 मार्चला महिलांनी मोर्चा काढला होता. यामुळे 8 मार्च हा महिला दिन म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर 1917 मध्ये पहील्या महायुद्धादरम्यान रशियामध्ये महिला कामगारांनी संप पुकारला होता. यु्दध थांबवा अशी घोषणाबाजी करत महिलांनी ब्रेड आणि पीस म्हणजेच अन्न आणि शांतता यासाठी एल्गार केला होता. त्यानंतर सम्राट निकोलस यांनी पदत्याग केला आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. नंतर युरोपमध्येही 8 मार्चला शातंतेचा पुरस्कार करण्यासाठी महिला रॅली काढण्यात आल्या. त्यानंतर 8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्याचे अधोरेखीत झाले. 1975 साली संयुक्त राष्ट्राने 8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्याची घोषणा केली.
आज जरी महिला दिनाला सुरूवात होऊन अनेक वर्ष झाली असली तरी समान वेतन, कामाच्या वेळांबरोबरच, अधिकार, सन्मानासाठी महिलांचा लढा कायम आहे.
जागतिक महिला दिन 2023 ची थीम
दरवर्षी जागतिक महिला दिन विशेष थीमसह साजरा करण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी महिला दिनाची थीम ‘जेंडर इक्वालिटी टुडे फॉर ए सस्टेनेबल टुमारो’ या संकल्पनेवर आधारित होती. यंदा महिला दिनाची थीम #EmbraceEquity ही आहे. तसेच जांभळा, पांढरा, हिरवा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.
हेही वाचा :