Monday, October 2, 2023
घर मानिनी Diary क्या मैं आज खुश हूँ???

क्या मैं आज खुश हूँ???

Subscribe

डॉ.स्वाती विनय गानू

 

- Advertisement -

सकाळी आरशात स्वतःला पाहिलं.,केस थोडे विस्कटलेले,डोळे थोडे पेंगुळलेले.पण मला वाटलं मी अशीही फारच लोभस दिसतेय.आणि मग मन कसं खुश होऊन गेलं.चहा काय झालाय आज कडक ,असं ऐकलं आणि तिचं मन खुश होऊन गेलं,आंघोळीला जाताना त्याने गाल ओढले मन मग खूपच खुश झालं.कुंडीतल्या रोपाला आलेलं लालचुटुक गुलाबाचं फूल पाहून तो जाम खुश झाला.आपण डायनिंग टेबलवरून उठून गेल्यावर आपल्या प्लेटमधला ठेवलेला शेवटचा घास तिने खाल्ला,कोणी पाहत तर नाही ना पाहून आणि तो खूप खुश झाला.आई बाहेर शेजारच्या काकूंशी बोलण्यात गुंग पाहून दुधावरची जाड साय तोंडात घातल्यावर रोहित कमालीचा खुश झाला.न सांगताच आईने गणपतीच्या कार्यक्रमातल्या परफाॅर्मरन्ससाठी नवे कपडे आणल्याने स्वरा किती खुश झाली.

आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होतो खरंतर पण हे खुश होणंच आपण विसरून तर नाही ना जात आहोत.लहानांना मनाजोगतं खेळणं मिळालं,आई बाबांनी उचलून घेतलं की ते मनमुराद हसतात.आवडीचं खायला मिळालं की बाकी काही नको असतं त्यांना.

- Advertisement -

वर्गात शाबासकी मिळाली की मान ताठ,मन खुश होतं.सुनेने स्वतःबरोबरच आपल्याला साडी आणली की सासूबाईंचे मन खुश होतं.नोकरीवरून येताना मुलाने न विसरता दुरुस्तीला टाकलेला चष्मा आणला,आईची औषधं आणली की मन खुश होऊन जातं.परदेशी असलेल्या नातवंडांनी आठवणीने फोन केला,तुला मिस करतोय आजू असं ऐकलं की मन बेटं जामच खुश होऊन जातं.आज काही सण नाही,ना वाढदिवस पण चक्क मुव्हीचा ,डिनरचा,लाॅन्ग ड्राईव्ह चा प्लान केला खास दोघांसाठी त्याने मग तिचं मन खुश होऊन जातं.लग्नातला अल्बम पाहताना,काय भन्नाट सुंदर दिसतेस तू,उगाच नाही आमची विकेट गेली असं त्याने म्हणावं आणि मग मन खुश होऊन जातं.

नेहमी मैत्रिणीबरोबर गप्पाच मारते असं वाटणारी ती
नव-याचं भरभरून कौतुक जेव्हा मैत्रिणीला सांगते
तेव्हा त्याचं मन कसं खुश खुश होऊन जातं.
खुश होणं खूप महाग ,अप्राप्य नसतं मात्र ………

जरा ,तेवढं मी ,माझं दुःख, माझी परिस्थिती,माझे प्राॅब्लेम यांना गोंजारण्याच्या सवयीतून बाहेर पडता यायला हवं.दिवसभरात एकतरी सुखाची हलकी झुळूक मनाला स्पर्श करुन जातेच नं.कधी मनासारखा स्वयंपाक होतो,कधी मुलांचं कौतुक ऐकायला मिळतं,कधी जुना मित्र, मैत्रीण शाळेतल्या टोपणनावाने चिडवतो,तू आधी भेटायला हवी होतीस असं खूप वर्षांनंतर भेटल्यावर म्हणतो, कधी चक्क सासूबाई आपलं कौतुक मनापासून सगळ्यांसमोर करतात,आपल्याला हवी असणारी ताजी फुलं मिळतात, हवी तशी किटी पार्टी रंगते,हप्त्यावर घेतलेल्या वस्तूचा शेवटचा हप्ता संपतो,भिशी लागल्यावर आवडीचं काही घेता येतं,छोटीशीच का होईना खरेदी करता येते,माहेरहून वहिनीचा -भावाचा चौकशीचा फोन येतो.मन खुश होण्याचे कितीतरी बहाणे असतात.पण आपण आपले रुसलेले,दुर्मुखलेले .ओंजळीत धरून ठेवता येईल एवढंही सुख पुरेसं असतं नाही का? फक्त ते घेता आलं पाहिजे. या खुश होण्याची पण एक मजा असते.

आपण कसे पिसासारखे हलके होत आनंदात,समाधानात तरंगत राहतो.जसं वाईट कोणी वागलं,बोललं की दिवसभर ते डोळ्यात गेलेल्या कुसळासारखं मनाला टोचत राहतं.राहून राहून डोळे भरून येतात.पण खुश होणं मात्र टोचत नाही, तर सुखावतं. मन आनंदाच्या मऊ मऊ गादीवर चक्क लोळत राहतं.दिवसभर तो आनंदाचा सुगंध आपल्याबरोबर दरवळत राहतो.कधी कधी तर त्या आठवणीने आपण स्वतःशीच हसतो.हेच तर स्वतःच्या प्रेमात पडणंअसतं.खुश रहायला कुठल्या शाळेत शिकवलं जात नाही.ना त्याचा काही अभ्यासक्रम, परीक्षा,डिग्री, सर्टिफिकेट असतं.ते आपल्याच हातात असतं.काही गोष्टी जमवायच्या असतात.तसंच ह्या खुश होण्याचं असतं.खुश होण्यात फायदा आपलाच असतो.आपण खुश असलो की घरातलं वातावरण आपोआप प्रसन्न होतं.रात्री गादीवर पडलात ना की फक्त एकच प्रश्न विचारा स्वतःला ‘क्या मै आज खुश हूॅ? कारण हा प्रश्न चांगलं काही आठवण्याची मनाला सवय लावेल मग झोपही कशी गोड गोड येईल.
दुखी होने के बहाने बहुत मिलेंगे जनाब,
एक बहाना खुश होनेका ही सही उसे जी लीजिए |

 

- Advertisment -

Manini