Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, आशिष शेलारांचा ठाकरे गटाला इशारा

मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, आशिष शेलारांचा ठाकरे गटाला इशारा

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावरून भाजपातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत माजी शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही ‘मुख्य’ विषय आणि स्वतःची ‘मुख्य’ पातळी सोडून तुमच्या ‘उप’ पातळीवर येणारच असाल, तर आम्ही कोकणातील, अस्सल मालवणी मुलखातील आहोत. मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी म्हटले होते. आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. बेइमानी केली ती भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर, महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत, अशा शब्दांत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून शरसंधान केले आहे.

हेही वाचा – बेइमान आम्ही की तुम्ही? युतीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

- Advertisement -

त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापाठोपाठ आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असो वा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो आपल्या मिळालेले प्रत्येक पद, जबाबदारी मानून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘एसटीपेक्षा’ जास्त फिरून गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस, शेतकरी, श्रमिकांचे अश्रू पुसणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र काम करणे, देवेंद्र फडणवीस हे आज ‘मुख्य’ असले काय आणि ‘उप’ असले काय… ते स्वयंसेवक आहेत. त्यांना काम करण्यासाठी तुमच्या सारखी ‘प्रमुख’ पदे लागत नाहीत, असे शेलार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस यांना कुणा ‘घरबशांनी’ शिकवणी घेण्याची गरज नाही. अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो की, फडणवीस गृहमंत्री आहेत, ‘गृहबसे’ मुख्यमंत्री नाहीत, हे विसरू नका! ‘फडणवीस सांभाळा’ असा अग्रलेखातून सल्ला देणाऱ्यांना आम्ही सांगतो तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा, जमले तर अजून तुमच्या पत्रकार पोपटलाल यांना आवरा नाही तर नॅनोत मावेल एवढाच पक्ष उरेल, असा उपोधिक सल्लाही त्यांनी दिला आहे.

‘मुख्य’ होण्याची हाव, हव्यास, हावरटपणा, हपापलेपण हे कुणाचे होते, त्यांनी ते कपटाने कसे मिळवले, ही काळी पाने दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तुमच्या नावाने लिहिली आहेत. स्वतःच ‘मुख्य’ असताना पक्षाचे 40 आमदार 12 खासदार पक्ष सोडतात, नगरसेवक, मंत्री, कार्यकर्ते सगळे ‘जय महाराष्ट्र’ करून निघून जातात, त्या अर्धग्लानी अवस्थेतून तुम्ही बाहेर अद्याप आलेले नाहीत. त्या अवस्थेत असल्यानेच तुम्हाला आपली गेलेली ‘मुख्य’ अवस्था सतावते आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – …आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, ठाकरे गटाचे फडणवीस यांच्यावर शरसंधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या टीकेचे विषय आहेत. तुम्ही आणि तुमचे संपादकमहर्षी ‘पत्रकार पोपटलाल” उठसूट सामनातून टीका करता, पण लक्षात ठेवा आम्ही एका संस्कारातून आलेले आहोत. संघ शाखेत आम्ही जे शिकलो ते तुम्ही न शिकल्याने तुमची ही अवस्था झाली आहे. आम्हाला भान ध्येयाचे आहे, दुसऱ्याला टोमणे मारण्याचे नाही. म्हणून पातळी सोडून आम्ही बोलणार नाही. तरीही तुम्ही मुख्य विषय आणि स्वतःची ‘मुख्य’ पातळी सोडून तुमच्या ‘उप’ पातळीवर येणारच असाल, तर आम्ही कोकणातील, अस्सल मालवणी मुलखातील आहोत… मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका, असा इशाराही आमदार शेलार यांनी दिला आहे.

- Advertisment -