उन्हाळात दुपारी उन्हाचा पारा वाढला की, त्याचा त्रास मोठ्यांसह लहानग्यांना देखील होतो. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषतः चिमुकल्या बाळाच्या आरोग्याची काळजी अधिक घेणं आवश्यक असते. नवजात किंवा एक- दोन वर्षाच्या बालकांना उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाणी कमी होऊन अतिशुष्कता होऊ शकते. यामुळे ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात अशी घ्या बाळाची काळजी
- बाळासाठी सुती कपड्यांचा वापर
लहान बाळांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे उन्हाळा असो किंवा इतरवेळी देखील नवजात बालकांना नेहमी कपड्यात गुंडाळून ठेवले जाते. उन्हाळ्यात आवर्जून बाळाला सुती कपडे घालण्याला प्राधान्य द्या. हे सुती कपडे घट्ट नसून बाळाला आरामदायी वाटावे असे असावे. बाजारामध्ये सुती कपड्याचे लांब हात-पाय असलेले कपडे मिळतात. त्याचा वापर केल्यास बाळाला आराम मिळेल.
- बाळाला अंघोळ घाला
उन्हात सतत घाम येत असतो. लहानग्याची त्वचा अधिक संवेदनशील असल्याने घामामुळे बाळाच्या शरिरावरील घामावर धूळ बसते. ही धूळ बाळाच्या शरिरावर बसल्यामुळे घामोळे उटतात. उन्हाळ्यातील घामोळे घालवण्यासाठी एसी किंवा सतत फॅन खाली बाळाला न ठेवता सकाळी व संध्याकाळी अंघोळ घाला. बाळाला आंघोळ घालणे शक्य नसेल तर त्याला थंड पाण्याने पुसून काढू शकता.
- डायपरचा वापर शक्यतो टाळा
उन्हाळ्यात बाळाला डायपर लावणे शक्यतो टाळा. सतत डायपरच्या वापरामुळे घाम बाळाच्या त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येऊन त्वचेचे विकार होऊ शकतात. म्हणून उन्हाळ्याच डायपरचा वापर शक्यतो टाळावा.
- पावडर लावणे टाळा
बऱ्याचदा बाळाला खूप घाम येतो म्हणून फ्रेश वाटावं म्हणून पावडरचा जास्त वापर बाळाच्या शरिरावर केला जातो. मात्र, घाम आल्यावर त्यात ही पावडर मिसळली जाते. यामुळे बाळाच्या शरिरावर खाज उठते. म्हणून शक्यतो ओल्या जागी पावडरचा वापर करु नका.
हेही वाचा :