घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरManoj Jarange : 'मी सागर बंगल्यावर येतो, माझा एन्काऊंटर करा'; जरांगेंचे फडणवीसांवर...

Manoj Jarange : ‘मी सागर बंगल्यावर येतो, माझा एन्काऊंटर करा’; जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

Subscribe

अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा डाव रचत आहेत. ते मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र रचत असून मला बदनाम करुन हे आंदोलन उधळण्याचा त्यांचा डाव आहे. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. त्यांना मला संपवायचे आहे तर मीच सागर बंगल्यावर येतो तिथे माझा जीव घ्या. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे, असा आक्रमक पवित्रा घेऊन मनोज जरांगे उपोषण स्थळाहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेतले आणि मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाचा निर्णय दोन्ही सभागृहात एकमताने घेण्यात आला. मनोज जरांगे यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत त्यांनी आंदोलनाचा हट्ट सोडावा असे ही आवाहन 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात करण्यात आले. मात्र त्यानंतर अधिक आक्रमक होत मनोज जरांगे यांनी 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात रास्ता रोकोची हाक दिली. याच दरम्यान मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर, संगीता वानखेडे यांनी आरोप केले. जरांगे हे हेकेखोर आणि कायम पलटी मारणारे आहे. त्यांना फोन आले की ते उपोषणाला बसतात, त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासून पाहिले पाहिजे, असे आरोप बारसकरांनी केले तर संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा थेट आरोप केला. बारसकर, आणि संगीता वानखेडे यांचा दावा आहे की ते देखील मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात होते. मात्र जरांगे यांच्या कायम कोलांटउड्यामुळे आम्ही आंदोलनापासून दूर झालो. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, असेही आरोप बारसकारांनी लावले.

- Advertisement -

मनोज जरांगेंनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनातील आंदोलकांवर कालपासून गुन्हे दाखल करण्याचे काम ठिकठिकाणी सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांनी मागील सहा महिन्यातील गुन्हे मागे घेण्याचीही मागणी लावून धरली आहे. ती मागणी कायम असताना 24 फेब्रुवारीपासून आंदोलकांवर नव्याने गुन्हे दाखल करणे सुरु झाले. मनोज जरांगे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याचा त्यांचा दावा आहे. सरकारकडून आंदोलकांची अशी कोंडी केली जात असल्यामुळे मनोज जरांगे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक झाले. त्यांनी त्यांचा संताप आजच्या पत्रकार परिषदेत – जाहीर बैठकीत व्यक्त केला.

मनोज जरांगे म्हणाले, शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझ्याविरोधात देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचत आहेत. त्यांना मला संपवायचे आहे. मला संपवले की हे आंदोलनही आपोआप संपेल असे त्यांना वाटते. त्यासाठीच मी आता त्यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असे आव्हान जरांगेंनी गृहमंत्री फडणवीसांना दिले. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही करत नाहीत. फडणवीसांनी ठरवले तर एका मिनिटांत सगेसोयऱ्यांचा कायदा तयार करुन मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. मात्र त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. पोलिस लाठीचार्जनंतर फडणवीसांना माफी मागावी लागली याचा त्यांना राग आहे. मी ब्राम्हण आहे, मी मराठ्यांना हरवून दाखवेल, हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळेच ते मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही. असा आरोप मनोज जरांगेंनी केला.

- Advertisement -

खडसे, पटोलेंनी फडणवीसांमुळे पक्ष सोडला

देवेंद्र फडणवीसांना आपल्यापुढे कोणी जात असेल ते जराही आवडत नाही. ते ब्राम्हणी कावा करुन त्यांना संपवतात. एकनाथ खडसे, नाना पटोले हे कधीही भाजप सोडू शकत नव्हते. पण ते फडणवीसांना खूपत होते. त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. पंकजा मुंडे यांना भागवत कराड हा पर्याय उभा करण्यात आला. विनोद तावडे यांना महाराष्ट्र सोडून राजकारण करावे लागले, ते देवेंद्र फडणवीसांमुळे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला. एकनाथ शिंदे हे कधीही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला सोडू शकत नव्हते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतून कधीही बाहेर पडू शकत नव्हते. मात्र त्यांना तुरुंगाची भीती दाखवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली.

मलाही तुरुंगात टाकण्याची त्यांची तयारी सुरु आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी आहे. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी मागे हटणार नाही. मी तुम्हाला पुरुन उरेल. तुम्हाला मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. आता तिथून मी आरक्षण घेऊन तरी येणार अन्यथा मला तिथेच संपवा, असा इशारा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -