घरदेश-विदेशगुजरातच्या नरोडा दंगलप्रकरणी माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 67 जणांची निर्दोष मुक्तता

गुजरातच्या नरोडा दंगलप्रकरणी माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 67 जणांची निर्दोष मुक्तता

Subscribe

अहमदाबाद : गुजरातमधील नरोडा गाव दंगलप्रकरणी विशेष न्यायालयाने 67 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजपा नेत्या माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश आहे. 2002मध्ये गोध्राकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती आणि नरोडा दंगलीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.

गोध्रा येथे 2002मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यांना आग लावण्यात आली होती. त्यात 58 जणांचा मृत्यू झाला होता. गोध्रा घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान अहमदाबादच्या नरोडा गावामध्ये जातीय हिंसाचार पसरला होता. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात आला. तपासाच्या आधारे माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांच्यासह 86 जणांवर ठपका ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

एसआयटी प्रकरणांसाठी नेमलेल्या विशेष न्यायाधीश एसके बक्षी यांच्या न्यायालयाने आज, गुरवारी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात एसआयटीने माया कोडनानी यांना मुख्य आरोपी बनवले. या 85 आरोपींपैकी 18 आरोपींचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. 21 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. नरोडा गाव हत्याकांड प्रकरणी आरोपींवर भादंवि कलम 302 (खून), 307 (हत्येचा प्रयत्न), 143, 147 (दंगल), 148, 129 ब, 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

नरोडा पाटिया दंगल प्रकरणी विशेष न्यायालयाने यापूर्वी कोडनानी यांना 28 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या दंगलीत 97 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, नंतर उच्च न्यायालयाने कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली होती. 2009पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात 187 जणांची चौकशी करण्यात आली, तर 57 प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी 13 वर्षे सुरू होती. सप्टेंबर 2017मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माया कोडनानीच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून हजर झाले. माया कोडनानी या दंगलीच्या वेळी गुजरातच्या मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -