घरदेश-विदेशप्रत्येक भारतीयासाठी डिजिटल हेल्थ कार्ड

प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल हेल्थ कार्ड

Subscribe

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची घोषणा

७४ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची भेट दिली असून त्यामुळे प्रत्येक भारतीयाचे आता डिजिटल हेल्थ कार्ड बनणार आहे. हेल्थ कार्डअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना डिजिटल ‘हेल्थ आयडी’ दिला जाणार आहे. यात संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची सर्व माहिती असेल. एखाद्या व्यक्तीवर किती चाचण्या झाल्या, त्याला कोणते आजार आहेत, कोणत्या डॉक्टरने त्याला औषध दिले, केव्हा दिले. तपासणीचा अहवाल काय आहे, ही सगळी माहिती यात समाविष्ट असेल. हे डिजिटल हेल्थ मिशन देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती ठरेल, असा दावा मोदी यांनी केला.

मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यावेळी लष्करातील तिन्ही दलाचे प्रमुख तसेच जवान येथे उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तसेच मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

पंतप्रधानांनी देशातील युवा पिढीला प्रेरणा म्हटले असून त्यांच्या आत्मनिर्भर या नार्‍याचाही पुनरोच्चार केला. शिवाय देशातील महिला सक्षम, बलळ होत असून तिला आणखी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लडाखच्या सीमेवर भारत – चीन जवानांमध्ये झालेल्या चकमकीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे शौर्य सार्‍या जगाने पाहिल्याचे म्हटले. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासीयांच्या सुरक्षेमध्ये असणार्‍या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणार्‍या FDI गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोरोना संकटकाळातही भारतात मोठ्या प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे. मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत. विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. शेतकर्‍यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याला हवं तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न दिले. ९० हजार कोटी थेट बँक खात्यात जमा केले, अशी माहिती मोदी यांनी दिली.

- Advertisement -

 कोरोनावरील तीन लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात

यावेळी मोदी यांनी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरही भारतात लस बनवण्याची प्रक्रिया प्राधान्याने सुरू असून लवकरच या लसीचे उत्पादन केले जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. कोरोनावरील लस बनविण्यासाठी भारतातील संशोधक अथक परिश्रम करत आहेत. देशात सध्या एक, दोन नव्हे तर तीन-तीन लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत. संशोधकांनी हिरवा झेंडा दाखवताच या लसींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. त्याची तयारी देखील झाली आहे. ही लस प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -