घरदेश-विदेशइम्रान सरकार कोसळले! पाकिस्तानात पुन्हा सत्ताबदल

इम्रान सरकार कोसळले! पाकिस्तानात पुन्हा सत्ताबदल

Subscribe

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारविरोधात सुरू असलेला हाय व्होल्टेज ड्रामा अखेर शनिवारी मध्यरात्री नाट्यमय घडामोडींनंतर संपला. रात्री उशिरा पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याने इम्रान खान सरकार कोसळले. इम्रान यांनी सरकारविरोधातील अविश्वास ठराव टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ते सगळे फोल ठरले. अखेर पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे अविश्वास ठराव 174 विरुद्ध शून्य अशा मतफरकाने पारित झाला. अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

पाकिस्तानमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने आता विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर दुसरीकडे इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षातर्फे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या सदस्यांनीही सभागृह सोडले. त्यामुळे पुढील कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवले. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर १७४ सदस्यांनी अविश्वास व्यक्त करत मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.
अविश्वास ठरावाआधीच मैदान सोडणार्‍या इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले असून विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे स्पष्ट झाले आहे. आम्ही सूडबुद्धीने काम करणार नाही. कायद्यापुढे कुणीही मोठे नाही. निरपराधांना तुरुंगात टाकण्याची आमची वृत्ती नसून गुन्हेगाराला कायदाच शासन करेल, असे सूचक विधान शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावरील कारवाईबाबत केले.

- Advertisement -

काश्मीरप्रश्नी तोडगा निघत नाही तोपर्यंत…

भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, मात्र जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. तसेच राष्ट्रीय सद्भावना आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवे सरकार प्रयत्नशील असेल, असे भाष्य पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच शाहबाज शरीफ यांनी केले आहे.

आजपासून नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू

पाकिस्तानला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले होते, मात्र परकीय शक्तींच्या कारस्थानाविरुद्ध आजपासून पुन्हा नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानची जनता इथल्या लोकशाहीचे संरक्षण करत आहे आणि यापुढेही करत राहील, असे ट्विट पंतप्रधानपदाची खुर्ची गमावलेल्या इम्रान खान यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -