घरसंपादकीयअग्रलेखविकासाभिमुख महानगरांचा लढाऊ साक्षीदार!

विकासाभिमुख महानगरांचा लढाऊ साक्षीदार!

Subscribe

– विजय बाबर

बदलत्या काळाबरोबर वाटचाल करताना तेवढ्याच खमकेपणाने लेखणी उचलणार्‍या दै.‘आपलं महानगर’च्या नवी मुंबई/रायगड आवृत्तीचा आज दुसरा वर्धापन दिन. डिजिटल क्रांतीवर स्वार होताना ‘आपलं महानगर’ने ‘माय महानगर’, ‘मानिनी’च्या व्यासपीठावरून वेब साईट, यू ट्यूब चॅनल, फेसबुक लाईव्ह असे विविधांगी बदल स्वीकारतानाच, मूळ ध्येयवादाला मात्र कुठेही मुरड घातली नाही. एकाचवेळी मुद्रित, दृकश्राव्य, तंत्रज्ञान आदी सर्व प्रकारच्या माध्यमात आपली एक आश्वासक ओळख देत वाचकांच्या पसंतीला उतरलेले ‘आपलं महानगर’ हे दैनिक खर्‍या अर्थाने विकासाभिमुख महानगरांचा गौरवशाली आणि लढाऊ असा साक्षीदारच मानावा लागेल.

- Advertisement -

रायगडमधील मातीचा कण न् कण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य तेजाचा महिमा गात आहे. ताठ बाणा, लढा, त्याग, शत्रूला परतवून लावताना धारातीर्थी पडलेले वीर या जिल्ह्याने जवळून पाहिले, अनुभवले आणि त्यांना आपल्या कुशीत सामावून घेतले. पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे रायगड जिल्हा आणि आसपासच्या परिसरात पहावयास मिळतात. प्राचीन किल्ल्यांसोबतच किनार्‍यावरील नारळी-पोफळीची झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. अष्टविनायकापैकी महड व पाली या ठिकाणची गणपती मंदिरे. तसेच घारापुरी बेटावर असणार्‍या एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार आहेत.

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून महाडच्या चवदार तळ्याला वेगळे महत्व आहे. ऐतिहासिक रायगड जिल्हा, विकासाच्या वाटेवरचे नवी मुंबई हे महानगर, येथील अस्सल कष्टकरी वर्ग, जुन्या नव्या प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष आणि तळिये, इर्शाळवाडीसारख्या नैसर्गिक संकटांवर मात करून स्वाभिमानाने, कष्टाने उभारी घेणारी ही माती सदैव प्रेरणादायी राहिली आहे. या मातीशी, येथील संघर्षाशी आपलेपणाने नाळ जोडून त्यांच्या जगण्याचा एक भाग बनलेले ‘आपलं महानगर’ हे फक्त दैनिक नाही तर तो आहे विचारांचा साथीदार! विविध सांस्कृतिक परंपरा, धर्म, भाषा असणार्‍या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या जिल्ह्यात ‘आपलं महानगर’ तृतीय वर्षात पदार्पण करत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- Advertisement -

मुद्रण क्षेत्रात आलेले नवे तंत्रज्ञान आणि भांडवलदारी वृत्तपत्रांचे प्रस्थ असले तरीही ‘आपलं महानगर’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड अर्थात महामुंबईत असणार्‍या भांडवलशाहीतील वृत्तपत्रांशी सामना करत ‘आपलं महानगर’ लोकप्रिय करणे हे मोठे आव्हान होते, पण ‘आपलं महानगर’ चालवताना लोकेच्छा, लोकहित आणि लोकभावनेची जाणीव सदैव ठेवत हे वृत्तपत्र सर्वसामान्य जनतेचे मुखपत्र झाले. समाजाच्या उत्थानाचा विचार करायचा या ध्येयापायी २४ तास ७ दिवस अखंड कार्यरत असणार्‍या ‘आपलं महानगर’च्या पत्रकारितेने फक्त मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नवी मुंबई, रायगड असे मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र आणि विदेशातही स्वत:ची ओळख प्रभावीपणे करून दिली आहे.

‘आपलं महानगर’चा जनाधार हीच खरी शक्ती होती आणि आहे. ३५ वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’चे प्रकाशन झाले, तेव्हा हे वृत्तपत्र सर्वसामान्य, उपेक्षितांच्या व्यथा-वेदनांचा हुंकार देणारे, जनता-जनार्दनाचे सार्वजनिक व्यासपीठ ठरावे, असा संकल्प होता. आतापर्यंतच्या वाटचालीत जनसेवेचा हा मूलमंत्र ‘आपलं महानगर’ने सतत जपला. ‘आपलं महानगर’ म्हणजे वृत्तपत्र आणि वृत्तपत्र म्हणजे ‘आपलं महानगर’ असे वाचक आणि ‘आपलं महानगर’चे एक नाते निर्माण झाले. ते जनतेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध ‘आपलं महानगर’ सातत्याने झुंजत राहिल्यानेच! लोकहिताच्या आड येणार्‍या सरकारी धोरणांचा ‘आपलं महानगर’ने सातत्याने प्रखर विरोध केला. प्रसंगी सरकारची, प्रशासनाची नाराजीही ओढवून घेतली, पण मूळ जनहिताच्या ध्येयापासून ‘आपलं महानगर’ कधी विचलित झाला नाही. सवंग लोकप्रियतेसाठी ‘आपलं महानगर’ने आपली मर्यादा सोडली नाही.

जवळपास साडेतीन दशकाचा साक्षीदार असलेले हे वृत्तपत्र यापुढेही वाचकांच्या पाठिंब्याच्या बळावरच सदैव लोकसेवा करीत राहील, असे वचन या वर्धापन दिनी देत आहोत. आतापर्यंतच्या वाटचालीत वाचक आणि जनतेशी असलेला ‘आपलं महानगर’चा सुसंवाद अधिकच वाढत गेला आहे. ‘आपलं महानगर’ची सातत्यपूर्ण वाटचाल आजही संयमाने, ठामपणाने आपल्या ध्येयाकडे सुरू आहे. अर्थातच या वाटचालीत वाचक, जाहिरातदार, वितरक, शुभचिंतक यांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आणि पाठीवर थाप देणारा आहे, हे नाकारता येणार नाही. ‘आपलं महानगर’ची पुढील वाटचाल दमदारच राहील आणि लोकाश्रयाच्या बळावर ‘आपलं महानगर’ जनतेशी बांधिलकी असलेली लोकपत्रकारिता पुढेही जपेल, अशी ग्वाही आम्ही देत आहोत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -