घरसंपादकीयअग्रलेखखाईन तर तुपाशी...

खाईन तर तुपाशी…

Subscribe

राज्यात सध्या जो काही सत्ता मिळवण्यासाठी खेळ सुरू आहे आणि निवडणुकीत मतदान करणार्‍या नागरिकाला गृहीत धरण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकूणच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी 15 दिवसांत मेळावा घेणार आहे. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संतापाला वाट मोकळी करून देणार आहे, असे ते म्हणाले. अर्थात, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी संताप व्यक्त करण्याची ही काही पहिली वेळ नसेल. कारण तसे पाहिले तर त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक मेळाव्यात ते आपला संताप व्यक्त करत असतात. त्यांची उफाळून येणारी संतापदग्ध वक्तव्ये ऐकताना समोर उपस्थित असलेली प्रचंड गर्दी भारावून जाते. इतकेच काय तर टीव्हीवरील सगळ्या वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांचेच भाषण दाखवले जाते, कारण आपला टीआरपी वाढतो, हे वाहिन्यांना माहीत असते. राज ठाकरे हे आपल्या मनातील बोलत आहेत, असे वाटत असल्यामुळे राज यांना ऐकणारा वर्ग खूप मोठा आहे. राज ठाकरे आपल्या मनातले बोलतात, असे ऐकणार्‍यांना वाटते, पण राज ठाकरे हे लोकांच्या मनापर्यंत का पोहचू शकत नाहीत, हे मात्र एक गूढ आहे. कारण इतका मोठा चाहता वर्ग असताना त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून का येत नाहीत, इतकेच नव्हे तर आमदार, खासदारकीसाठी उभ्या राहणार्‍या उमेदवारांची झिपॉझिट्स जप्त होतात, हे एक मोठे आश्चर्य आहे.
मोठा पेचप्रसंग ओढवला की लोक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जातात. आपण या प्रश्नात लक्ष घालतो, असे सांगितल्यावर तिथे गेलेल्या लोकांना हायसे वाटते. आपला प्रश्न मार्गी लागेल असे वाटते. त्यानंतर राज ठाकरे त्या प्रश्नावरून सरकारला आवाज देतात, तेव्हा यंत्रणा हलते, याचा बरेचदा लोकांना अनुभव आलेला आहे, मग ते सरकार कुठल्याही पक्षाचे असो, म्हणून राज यांना व्यवस्थेचे इंजिन म्हटले जाते. कारण त्यांच्यामुळे सरकारच्या यंत्रणा सक्रिय होतात. काही वेळा लोक त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर, ते आपला संताप व्यक्त करताना विचारतात, गरज पडते तेव्हा तुम्ही माझ्याकडे येता, पण मतदानाच्या वेळी तुम्हाला माझी आठवण कशी राहत नाही, त्यावेळी त्या लोकांकडे काही उत्तर नसते. त्यामुळे लोकांना आपली कामे करण्यासाठी राज ठाकरे हवे आहेत, तर मग ते त्यांना निवडणुकीत का नकोत, या प्रश्नाचे उत्तर मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही मिळणे अवघड होऊन बसले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर राजकारणाचा चिखल झाला आहे, असा संताप लोक व्यक्त करत आहेत, असे राज म्हणतात, पण राज यांनीही जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही कोणता झेंडा घेऊ हाती अशीच शिवसैनिकांची द्विधा अवस्था झाली होती. आताही दोन्ही बाजूंचे काही कार्यकर्ते सध्याच्या राजकीय वातावरणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी अस्मिता जागवावी, अशी भावना व्यक्त करणारे पोस्टर्स काही ठिकाणी लावत आहेत. पण कार्यकर्त्यांना वाटत असले तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तसे वाटणे आवश्यक आहे. पण तसे अजून तरी काही संकेत मिळत नाहीत. उलट, कोकणात बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी एकवेळ घरात बसेन, पण तडजोड करणार नाही. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे तो मी करणार नाही. आपल्याला कुणाशी युती आघाडी नको, त्यापेक्षा आपण स्वबळावर लढायचे, असे कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले.
राज यांची एकूणच भूमिका पाहिल्यानंतर पुढील काळात त्यांची भूमिका ही ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’, अशीच दिसत आहे. पण तूप मिळण्यासाठी मोठी तयारी करावी लागते, हेही त्यांना लक्षात घ्यावे लागेल आणि तशी तयारी करावी लागेल. कारण बूट कुठे टोचतो, हे जो त्याचा वापर करतो, त्यालाच माहीत असते, अशी एक म्हण आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रभावी नेतृत्व असतानाही निवडणुकांमध्ये यश का मिळत नाही, यामागे काय कारण असावे, हे स्वत: राज ठाकरे यांनाच माहीत असावे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेची दोन शकले झाली. त्यामुळे संघटनेची शक्ती विभागली गेली. दोन्ही बाजूंचे नुकसान झालेे. त्याचा फायदा विरोधातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला. मराठी लोकांच्या हितासाठी निर्माण झालेल्या या संघटनेत दोन ठाकरे बंधू जर आपल्या राजकीय हितासाठी दोन तुकडे करत असतील तर हे कुठल्या तोंडाने मराठी माणसाला ऐक्याचा संदेश देत आहेत, असा प्रश्न मराठी माणसांना पडला. त्यातून दोन्ही बाजूंची ताकद कमी होत गेली. उद्धव ठाकरेे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झाल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. राज ठाकरे यांनी नवा पक्ष काढला तेव्हा त्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, पण पुढे तो ओसरत गेला. त्याचे उत्तर त्यांनाच मिळानासे झाले आहे. कारण गर्दी तर जमते, त्यात दर्दी किती आहेत, हे त्यांना शोधावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -