घरसंपादकीयअग्रलेखमहायुतीला विलंब भोवणार !

महायुतीला विलंब भोवणार !

Subscribe

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन ४५ दिवस झाले असताना महायुतीत अजूनही कुठे उमेदवारीवरून काथ्याकूट तर कुठे नाराजीनाट्य सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले. या काळात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.

ठाणे, नाशिक, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, कल्याण आदी मतदारसंघात उशिरा उमेदवार जाहीर करून महायुतीने नक्की काय साध्य केले, हा प्रश्नच आहे. यातून महायुतीकडून मतदारांना कसे गृहीत धरण्यात येत आहे, हे स्पष्ट होते. केंद्रात ४०० चा आकडा पार करण्यासाठी प्रत्येक जागेवरची निवडणूक महायुतीसाठी महत्वपूर्ण आहे, मात्र विलंबाने ज्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेत, त्या सर्वच ठिकाणी महायुतीची डगमगती अवस्था आहे. याउलट विरोधी उमेदवार प्रचारात कोसो पुढे गेले आहेत.

- Advertisement -

नाशिकचा विचार करता, हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार असतानाही त्यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ घेतला की, प्रतिस्पर्धी राजाभाऊ वाजे यांनी शहरी भागात भरपूर प्रचार करीत आपले स्थान भक्कम केले. जर गोडसेंनाच उमेदवारी द्यायची होती, तर इतका कालावधी वाया का घालवला? गोडसेंनी दोन वेळा सपाटून पराभूत केलेल्या भुजबळांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आलेच कसे? त्यातून ओबीसींचे संघटन झाले असेल, तर आता त्याचा फटका कुणाला बसणार आहे? या प्रश्नांची उत्तरे आता युतीच्या पदाधिकार्‍यांना द्यावी लागतील.

मुंबईनंतर शिवसेनेची सर्वाधिक शक्ती असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीही एकनाथ शिंदे यांना लवकर जाहीर करता आली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अगदी सुरुवातीलाच अपेक्षेप्रमाणे राजन विचारे यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, मात्र शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपने दावा केल्याने तेथे मोठा तिढा निर्माण झाला होता. मोठा काथ्याकूट केल्यानंतर ठाण्याची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आणि तेथे नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

पण उमेदवारी मिळायला इतका मोठा विलंब झाल्याने म्हस्के यांना मतदारसंघ पिंजून काढताना घाम फुटणार आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी ठाण्यात महायुतीचा पहिला महामेळावा झाला. यावेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार व आपण सर्व ‘नमो सैनिक’ असा पहिला नारा नरेश म्हस्के यांनी दिला होता. या वक्तव्यावर शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज झाले होते; पण ‘नमो सैनिक’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचल्याने नरेश म्हस्के यांचा उमेदवारीसाठीचा मार्ग प्रशस्त झाला.

दिल्लीश्वरांची त्यांच्यावर कृपा झाली, पण शिवसैनिकांची नाराजी कशी दूर करणार हादेखील म्हस्केंसमोर आता प्रश्नच आहे. त्यातच भाजपचेही कार्यकर्ते म्हस्केंवर नाराज असल्याने ती दूर करण्यासाठी म्हस्केंना आता वेळ कमी पडू शकतो. दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना सुटली खरी; पण या जागेवरही भाजपने यापूर्वीच काटे टाकून ठेवले आहेत. या मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांना भाजपची उमेदवारी जाहीर होईल, असे मानले जात होते. आपलाच उमेदवार असेल या अपेक्षेने प्रचाराला लागलेले भाजपचे कार्यकर्ते जाधवांच्या उमेदवारीने नाराज आहेत.

ईडी चौकशीचा ससेमिरा आणि गद्दारीचा शिक्का असलेल्या जाधव यांच्या प्रचारात उतरून आम्ही आता मतदारांना सामोरे गेल्यास विधानसभा निवडणुकीत आम्हाला किंमत मोजावी लागेल, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कल्याणच्या बाबतीतही एकनाथ शिंदेंवर भाजपने अशाच प्रकारचा दबाव टाकल्याचे पहायला मिळाले. स्वत:च्या पुत्राला तिकीट आणण्यासाठी शिंदेंना अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागणे यातच सारे आले. उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाजन यांच्या समर्थकांची नाराजी दूर करणे कठीण होणार आहे.

महिनाभरापूर्वीच शिंदे गटात दाखल झालेले रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. १९ बंगल्याचा घोटाळा किंवा उद्धव ठाकरेंच्या अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांची ईडीची चौकशी सुरू होती. यामुळे त्यांच्यासाठी राजकीय वारे उलट्या दिशेने वाहत होते. उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती, मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत येणे, जनतेला किती रुचेल हे येणारा काळच ठरवेल.

कल्याण, ठाणे, नाशिक मतदारसंघ ओढून घेण्यात शिंदेंना यश आले असले तरी पालघर मात्र गमवावे लागेल, असे चित्र आहे. भाजपने या जागेवरही दावा केल्याने आता शिंदेंना एक पाऊल मागे यावे लागेल, असे दिसते. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला, तर हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष नेमकी कोणती भूमिका घेईल याविषयी उत्सुकता आहे. महायुतीने उमेदवार जाहीर करताना प्रचंड उशीर केल्याने त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यातून महायुती स्वत:ला कशी सावरते, हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -