घरसंपादकीयअग्रलेखफुटली एकदाची कोंडी !

फुटली एकदाची कोंडी !

Subscribe

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील दोन आणि काँग्रेसने मुंबईतील एका जागेवरील उमेदवारांची घोषणा करताच मुंबईतील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले, तर दुसर्‍याच दिवशी शिवसेना आणि भाजपातील ठाणे, पालघरच्या जागावाटपाचा अखेरचा तिढाही मार्गी लागल्याने महामुंबईचे रणांगण आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून जागावाटपासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जोरदार रस्सीखेच सुरू होती. महायुतीचे सरकार स्थापन करताना विधानसभेत जास्त आमदार असूनही भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. राज्याच्या कारभाराची धुरा त्यांच्या हाती सोपवली. स्वत: मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून दोन पावले मागे जात उपमुख्यमंत्रीपद गोड मानून घेतले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती.

- Advertisement -

या युतीत भाजपने २५ जागा लढवून २३ आणि शिवसेनेने २३ जागा लढवून १८ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून १९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. जिंकलेल्या जागांच्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीतील प्रत्येक पक्षाला विद्यमान खासदार असलेली जागा मिळणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. जागावाटपाच्या बोलणीचा नारळ फुटण्याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईत एण्ट्री मारली आणि भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचे जाळे टाकत शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची खेळी केली.

अब की बार ४०० पारचे लक्ष्य समोर असलेल्या भाजपला राज्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्याच होत्या. त्यासाठी महायुतीतील सहकार्‍यांवर सर्व युक्त्या आजमावल्या जात होत्या, पण तेही काही सहजासहजी तयार होत नव्हते. कारण आता जर संकोच झाला तर भविष्यात तोच कल राहील. तो त्या दोन्ही पक्षांना टाळायचा होता. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील, यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी, रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने, मुंबई उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा राजकीय बळी देण्यात आला.

- Advertisement -

प्रत्येक खासदाराची जागा शाबूत ठेवण्याचे आणि त्यांना निवडून आणण्याचा शब्द एकनाथ शिंदे पाळू शकले नाहीत. डोक्यावर टांगती तलवार असलेले खासदार कधी वर्षा तर कधी ठाण्याच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन करत एकनाथ शिंदेंवरील दबाव वाढवत होते. या धाकधुकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नाशिकच्या जागेवर आधी भाजप, मग राष्ट्रवादी आणि अचानक मनसेकडून दावा होऊ लागला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या किरण सामंतऐवजी नारायण राणे यांच्यासाठी भाजपने खेचून घेतली. याच प्रकारे दक्षिण मुंबई, ठाणे-कल्याण, पालघरच्या जागेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरूच होते. दुसरीकडे अजित पवार गटाने सातार्‍याच्या जागेची अदलाबदल करत आणि राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर यांना आपल्या कोट्यातून वाटा देत ४ जागा पदरात पाडून घेतल्या.

त्यामुळे प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचेच घोडे अडले होते. अखेर महामुंबईतील पाचव्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना हे जागावाटपाचे त्रांगडे सुटले. त्यात सर्वाधिक २८ जागा म्हणजेच मागच्या वेळपेक्षा ३ जागा जास्त मिळवून भाजपने आपला दबदबा राखला आहे. या जागावाटपात खर्‍या अर्थाने नुकसान कुणाचे झाले असेल तर ते शिवसेनेचे. शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या १५ जागा आल्या, म्हणजेच मागच्या वेळपेक्षा ८ जागांचे शिवसेनेचे नुकसान झाले. राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे तेवढ्या म्हणजे ४ आणि रासपच्या वाट्याला १ जागा आली.

दक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचे नाव शिवसेनेच्या पहिल्याच यादीत होते, परंतु नंतरच्या रस्सीखेचीत कधी पारडे शिवसेनेच्या तर कधी भाजपच्या बाजूने झुकत होते. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आणखी एखादी तरी जागा येईल की नाही याबाबत सारेच साशंक होते. भाजपने दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा करत आपले संभाव्य उमेदवार म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले होते, मात्र शिंदे गटाने दक्षिण मुंबईवरील आग्रह कायम ठेवल्याने भाजपला येथून माघार घ्यावी लागली.

शिवसेनेने येथून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यात लढत होणार आहे, तर उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उतरवल्याने येथे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत असेल. याप्रकारे शिवसेना मुंबईत ३ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेच्या ठाणे-कल्याणच्या उमेदवारांना भाजप पदाधिकार्‍यांचा असलेला विरोध लक्षात घेता या दोन जागांची घोषणाही रखडली होती.

त्यावरूनही बुधवारी पडदा हटला. अपेक्षेनुसार कल्याणची जागा डॉ. श्रीकांत शिंदे यांना, ठाण्यातून नरेश म्हस्के, तर नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. पालघरची जागा मात्र भाजपच्या वाट्याला गेली आहे. काही का होईना घोडे वेशीपाशी आल्यावर जागावाटपाचे गणित सुटल्याने महायुतीच्या पुढच्या लढाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -