घरसंपादकीयअग्रलेखहमाम मे सब नंगे

हमाम मे सब नंगे

Subscribe

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एक्सवर देत बावनकुळेंच्या नावाचा उल्लेख न करता काही प्रश्न उपस्थित केले. यामागे राऊत यांचा असा हेतू होता की मी कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत शिरत नाही, तेवढा शिष्टाचार मी पाळतो, पण तुम्हीच ओळखा हे कोण आहेत, त्यातही त्यांनी साडेतीन कोटी रुपये त्या कॅसिनोत उडवले, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे म्हटले आहे. नुकताच डीपफेकच्या माध्यमातून रश्मिका मंदान्ना या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून एकच वादळ उठले होते, पण हा फोटो मंदान्नाचा नसून अन्य महिलेचा होता असे उघड झाले. राऊत यांनी जो बावनकुळेंचा फोटो एक्स केला, त्यानंतर पहिल्यांदा तसेच काही झाले तर नाही ना असे तो पाहणार्‍यांना वाटले, पण स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण आपल्या कुटुंबासोबत मकाऊला गेलो होतो, असे मान्य केल्यानंतर त्यांच्याविषयीची शंका घेण्याचा प्रश्नच निकाली निघाला.

आता तिथे ते नेमके काय करत होते, हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. कारण कॅसिनो आणि रेस्टॉरंट एकत्रच असल्यामुळे पाहणार्‍यांचा गैरसमज होत आहे, असा बावनकुळेंचा दावा आहे, पण राऊत यांनी हा फोटो व्हायरल केल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली. एखाद्या नेत्याच्या कृत्यामुळे पक्षाची बदनामी होत असेल तर त्याला अलगद बाजूला केले जाते. याची प्रचिती भाजपच्या एका नेत्याचा आक्षेपार्ह खासगी व्हिडीओ एका वृत्तावाहिनीने प्रसारित केल्यानंतर आली आहे. आता तो नेता फारसा प्रसारमाध्यमांवर दिसत नाही. राऊत यांची ही विकृत मानसिकता आहे, अशी थोडक्यात प्रतिक्रिया राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी बावनकुळेंच्या पुढे काय वाढून ठेवलेले आहे ते त्यांना पुढील काळात दिसेल.

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बावनकुळेंची बदनामी झाल्यानंतर भाजपवालेही पेटून उठले. त्यांनी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा हातात ग्लास घेतलेला फोटो व्हायरल करून प्रत्युत्तर दिले. त्यावर पुन्हा राऊत भडकले आणि थेट मोदींना लक्ष्य केले. राऊत यांनी फोटो व्हायरल करून यांना ओळखलत का, असा प्रश्न केल्यानंतर तो मीच आहे, असे बावनकुळे यांनी मान्य केल्यानंतर तो मी नव्हेचचा प्रश्न निकाली निघाला, पण यावेळी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांनी आपल्याला शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर मोठे राजकीय वादळ उठले होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यांचे बोलवते धनी कोण आहेत याच्यापर्यंत पोहचायला हवे. त्यावर संजय राऊत म्हणाले होते, ‘राजकारणात पैसा कसा येतो हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का, हमाम मे सब नंगे.’ आज राऊत यांनी बावनकुळेंचा फोटो व्हायरल केला.

त्यानंतर भाजपने आदित्य ठाकरे यांचा फोटो व्हायरल केला. राजकारणाबद्दल असे म्हटले जाते की, ‘गरिबांची सेवा करता करता श्रीमंत होण्याचा हा व्यवसाय आहे.’ राजकारणात येऊन अगदी शेवटपर्यंत सामान्य जीवन जगणारे एखाद दुसरे गणपतराव देशमुख असतात, पण बाकी पाहिले तर असे दिसेल की राजकारणात आलेली मंडळी भराभर श्रीमंत झालेली दिसतात. ज्या वेगाने ही मंडळी श्रीमंत होतात ते पाहिल्यावर सर्वसामान्य माणसाला आश्चर्याने तोंडात बोटे नव्हे तर अख्खा हात घालण्याची वेळ येते. त्यांच्या अर्धा रस्ता व्यापणार्‍या आलिशान गाड्या, राहणीमान, सहकुटुंब विदेशवार्‍या, विदेशातून आल्यावर तिथले गोडवे गाणे, तिथले रस्ते किती छान आहेत, पण आपल्याकडे नाहीत, मात्र या राजकीय नेत्यांना आपल्याकडचे रस्ते चांगले करण्याला कुणी रोखले आहे, पण त्यांच्या कामातून दरवर्षी मिळणार्‍या टक्केवारीचे काय? राजकीय नेत्यांची श्रीमंती ही याच टक्केवारीवर उभारलेली आहे हे आता काही लपून राहिलेले गुपित नाही.

- Advertisement -

आता राजकारणात श्रीमंत असलेले बहुतांश नेते सुरुवातीला गरीब होंते, मग आता हे इतके श्रीमंत कसे झाले. सुरुवातीला भूर्जीपाव विकणारा एखादा नेता लंडनमध्ये व्हिला विकत घेतो, मोठ्या हॉटेलांचा मालक होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक नेत्यांच्या विदेशात मोठ्या मालमत्ता असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. काहींची विदेशात हॉटेल्स आहेत. त्यांच्या मुलांकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे हवी ती मौज करणे त्यांना परवडते. ही मंडळी कंटाळा आला की सहकुटुंब विदेशात जाऊन महागड्या हॉटेलात राहतात, मजा करतात. काही वेळा त्यांचे फोटो स्वत:च सोशल मीडियावर व्हायरल करतात. राजकीय नेते आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांची चंगळबाजी हे लोकांसाठी आता काही नवीन नाही. त्यांनी एकमेकांची बदनामी करण्यात आनंद मानणे म्हणजे एका शेळीने दुसर्‍या शेळीच्या शेपटीकडे बोट दाखवण्यासारखे आहे. लोकांनी आपल्याला लोकांची सेेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, एकमेकांची बदनामी करण्यासाठी नाही हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. कारण हमाम मे सब नंगे हे लोकांना माहीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -