घरसंपादकीयअग्रलेखसर्वांना सुखसमृद्धी लाभू दे महाराजा...

सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे महाराजा…

Subscribe

आजपासून नवीन वर्ष २०२४ सुरू झाले. हे वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, जे कुणी ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची या वर्षात भरघोस प्रगती होवो, ज्यांनी ज्यांनी या वर्षात काही मिळवण्याचे संकल्प केलेले आहेत, ते पूर्णत्वास जावोत आणि सगळ्यांच्या मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊन त्यांच्या जीवनात आनंदाची आणि उत्साहाची बरसात होवो, सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात हे वर्ष सुखसमृद्धी घेऊन येऊ दे, यासाठी वर्षांरंभी महानगरच्या वतीने हे कळकळीचे गार्‍हाणे महाराजा. महाराष्ट्र हे राज्य नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंंबेडकर यांच्यासोबत टिळक आणि आगरकर अशा मोठमोठ्या समाजसुधारकांचा आणि देशासाठी जीवन समर्पण करणार्‍या लोकनेत्यांचा वारसा लाभलेला आहे, मानवी जीवनाला नवी दिशा देणार्‍या अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा उगम महाराष्ट्रातून झालेला आहे.

मुंबई, पुण्यासारखी आधुनिक शहरे या राज्यात आहेत. या दोन्ही शैक्षणिक आणि आर्थिक केंद्रांमुळे सगळ्या जगाचे लक्ष भारताकडे आकर्षित होत असते. मोठ्या प्रमाणात जागतिक गुंतवणूक महाराष्ट्राकडे येत आहे. देशाचे पंतप्रधान मूळचे गुजरातचे असल्यामुळे शेजारीच असलेल्या प्रगत महाराष्ट्रासारखी आपल्या राज्याचीही प्रगती व्हावी, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकार अनेक महत्वाच्या आस्थापना महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेत आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील हिरे व्यापार गुजरातमध्ये नेण्यात आला. मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील बर्‍याच कंपन्या गुजरातकडे नेण्यात येत आहेत. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय नेते तू तू मै मै करत आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे त्यांच्या गृहराज्याला जास्त झुकते माप देण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ते किती झुकते असावे, याचा मोदींनी विचार करण्याची गरज आहे. कारण ते माप झुकते करताना कलंडले, तर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपण देशाचे पंतप्रधान आहोत. त्यामुळे महाराष्ट्राचाही विचार करण्याची गरज आहे, हा विचार त्यांच्या मनात कायम जागा राहू दे महाराजा. कोरोना आपल्या नव्या भावबंदांच्या माध्यमातून आपलं डोकं पुन्हा वर काढत आहे, त्याला वेळीच ठेचून टाक महाराजा.

- Advertisement -

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असले तरी सध्या ते राजकीय अरिष्टामध्ये सापडलेले आहे. राजकीय पक्षांमध्ये गट आणि तट पडलेले आहेत. कोण कुणाची साथ सोडून कुणाचा हात धरेल, याचा काही भरोसा राहिलेला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आम्ही हे सगळे जनतेच्या हितासाठी करत आहोत, असे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती खरोखरच तशी आहे का, हाही एक प्रश्न आहे. राजकीय नेत्यांच्या बदलत्या भूमिका पाहून येणार्‍या काळात आपण काय करावे आणि किती पक्षांना आणि गटांना कसे मतदान करावे, अशा संभ्रमात मतदार नागरिक पडलेला आहे. त्यामुळेच अनेक मतदारांचा कल नोटाचे बटन दाबण्याकडे होत चाललेला आहे, पण ते चांगल्या लोकशाहीसाठी पोषक नाही. कारण लोकशाहीत लोकांच्या मताला किंमत असते.

जनमतावरच लोकशाही टिकून असते. लोकांना आपले मत बाद करावे, असे वाटत असेल तर ते लोकशाहीसाठी सुचिन्ह नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन लोकहिताचा विचार करण्याची सुबुद्धी दे महाराजा, असे म्हणावेसे वाटत आहे. कारण या वर्षात लोकसभा, विधानसभा आणि न्यायालयाचा निर्णय बाजूने लागला आणि सत्ताधार्‍यांची इच्छा बलवान झाली तर महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. २०२४ हे वर्ष त्यामुळे राजकीयदृष्ठ्या कलाटणी देणारे असेल, त्यामुळे निवडणुका लढवताना आपण देशाला मार्गदर्शक ठरणार्‍या राज्यातील लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान इथल्या राजकीय नेत्यांना येऊ दे, कारण महाराष्ट्र जर राजकीयदृष्ठ्या दिशाहीन झाला, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम अन्य राज्यांवर होत असतो. महाराष्ट्र देशाचे शक्तिस्थान आहे, त्यामुळे आपल्याला परिपक्वतेने वागायला हवे, हे या नेत्यांच्या लक्षात येऊदे महाराजा. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे, त्यात समजूतदारपणाने मार्ग निघू दे महाराजा.

- Advertisement -

सध्या देशात भाजप आणि त्याच्या विरोधात प्रादेशिक पक्ष असा लढा सुरू आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची सध्या ताकद कमी झालेली आहे. प्रादेशिक पक्षांची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे देशात काही राज्यांचा अपवाद वगळता भाजपचा वरचष्मा आहे. भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व आहे. त्यामुळे मोदी हैं तो मुमकिन हैं, असेच सगळ्या भाजपवाल्यांना वाटत आहे, पण असे प्रत्येक वेळी होत नाही, हे भाजपवाल्यांच्या लक्षात येऊ देत. आज आपले अच्छे दिन असले तरी प्रत्येक दिवस सारखा नसतो, त्यामुळे देशातील अन्य राजकीय पक्षांच्या मतांचा विचार करण्याची सुबुद्धी भाजपला मिळू दे. त्याचसोबत प्रादेशिक पक्षांनीही केवळ मोदीविरोध ही भावना न ठेवता, त्यांनी काही चांगले काम केले असेल तर त्याचाही विचार करावा. कारण आपण वेगवेगळे राजकीय पक्ष असलो तरी एका देशाच्या लोकशाही छत्राखाली उभे आहोत, हा एकसंधतेचा विचार प्रत्येक नेत्याच्या मनात जागा राहू दे महाराजा. होय महाराजा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -