घरसंपादकीयअग्रलेखवर्ल्डकपचे कवित्व...

वर्ल्डकपचे कवित्व…

Subscribe

यंदा भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने विक्रमांचे पूल बांधले. प्रत्येक खेळाडूची कामगिरी नेत्रदीपक झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादेत झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात सहज विजय मिळविला. सलग १० सामने जिंकणार्‍या भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक २०२३ स्वतःच्या नावे केला. यामुळे १४० कोटी भारतीयांची मने दुखावली गेली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अश्रू आवरता आले नाहीत, पण येथूनच राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली. काही हास्यास्पद आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अंतिम सामना होऊन तीन दिवस झाले तरी अजून त्याचे कवित्व संपलेले नाही. या अंतिम सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, पण भारताला या विश्वविजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवून देणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव तसेच दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचे नेतृत्व करणारे माजी कर्णधार एम. एस. धोनी यांना निमंत्रित केले गेले नसल्याचे सांगण्यात येते. दस्तुरखुद्द कपिल देव यांनीच ही माहिती दिली आहे. १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकणार्‍या आपल्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या सामन्यासाठी निमंत्रित केले जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तेवढा मोठेपणा दाखवला नाही, असेच म्हणावे लागेल.
वास्तवात अनुकूल परिस्थिती नसतानाही शानदार खेळ करत तमाम भारतीयांची मान उंचावणारी कामगिरी करणार्‍यांचा विसर कसा पडू शकतो, हाच खरा प्रश्न आहे. त्यातही विसर पडला की जाणूनबुजून डावलले गेले? या अशाच कारणामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले. यावरदेखील राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांनी त्याचे भांडवल केले असले तरी देशातील दिग्गज खेळाडूंसह ‘पुरस्कार वापसीसाठी’ तत्पर असलेल्या मान्यवरांनीदेखील याबाबत मौन बाळगले आहे, हे अतिशय खेदजनक आहे. याशिवाय राजकीय स्तरावर विविध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत ते वेगळेच. पहिला आक्षेप घेतला गेला तो अंतिम सामना खेळवण्यात आलेल्या स्टेडियमबद्दल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता, पण तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर का खेळवला गेला नाही? इतकेच काय, ईडन गार्डन का नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याची तुलना थेट महाराष्ट्रातील उद्योगांशी केली. राज्यातील उद्योग
ज्याप्रकारे गुजरातमध्ये पळविले जात आहेत, त्याप्रमाणे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामनादेखील गुजरातमध्ये नेण्यात आला, अशी टीका ठाकरे गटासह काही विरोधकांनी केली आहे. मुळात विश्वचषक स्पर्धेचे पहिले वेळापत्रक २७ जून २०२३ रोजी, तर सुधारित वेळापत्रक ९ ऑगस्ट २०२३ रोजी जारी करण्यात आले. या दोन्ही वेळापत्रकांमध्ये अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मग तेव्हा आक्षेप घेतला गेला नाही हे विशेष!
आता या स्पर्धेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काही केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते, बॉलिवूड तारे-तारका उपस्थित होते, पण या सामन्यातील भारताच्या पराभवाला काही नेटकर्‍यांनी नरेंद्र मोदी स्टेडियम आणि पंतप्रधान मोदी यांना जबाबदार ठरवले आहे. पंतप्रधान स्टेडियममध्ये जाण्याआधी भारताला ऑस्ट्रेलियाचे तीन गडी एका पाठोपाठ एक बाद करण्यात यश आले होते, पण पंतप्रधान स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर एकही खेळाडू बाद झाला नसल्याची टिप्पणी सोशल मीडियावर फिरू लागली. हाच धागा पकडत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता ‘पनौती’ असे म्हटले आहे. राजस्थानच्या जयपूरमधील जालोर येथे प्रचार सभेत राहुल गांधी यांचे भाषण सुरू होताच जमलेल्या समुदायाने ‘पनौती पनौती’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, ‘बरे-वाईट काही का असेना, आपली टीम जिंकली असती; पण पनौतीने पराभूत केले.’
केवळ ‘मोदी’ नावाचा उल्लेख केल्याने आधी खासदारकी गमावली आणि नंतर ती पु्न्हा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा अशा प्रकारे उल्लेख करणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’सारखेच आहे. त्यातही लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना तसेच तीन राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असताना असे वक्तव्य करणे विपरीत परिणाम करू शकते. वस्तुत: प्रत्येक खेळात हार-जीत तर असतेच. भारतीय संघातील फलंदाज असो, गोलंदाज असो वा क्षेत्ररक्षक असो प्रत्येकाने आपापल्या परीने पुरेपूर प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले एवढेच म्हणता येईल. ‘बेटर लक नेक्स्ट टाइम’ एवढेच म्हणणे आपल्या हाती आहे. क्रिकेट हा ‘सभ्य लोकां’चा खेळ समजला जातो. त्यावरून अशा प्रकारचे राजकारण रंगणे अतिशय चुकीचे आहे. राजकीय अभिनिवेश कोणताही असू शकतो, पण किमान पदाची प्रतिष्ठा तरी राखली गेली पाहिजे. यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकरी, मजूर, गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा तसे निरर्थक विषय खूप आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -