घरसंपादकीयदिन विशेषविद्युत तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

विद्युत तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

Subscribe

सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मोर्स हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक होते. त्यांचा जन्म २७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्सटाऊन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण अँडोव्हर येथील फिलिप्स अकॅडमीत व पुढे येल कॉलेज येथे झाले. विद्यार्थीदशेतच त्यांना विद्युत या विषयाची त्यावरील व्याख्यानामुळे गोडी निर्माण झाली. त्याच वेळी त्यांना लघू व्यक्तिचित्रे काढण्याचा छंद जडला.

१८१७ मध्ये त्यांनी आपले धाकटे बंधू सिडनी एडवर्ड्स मोर्स यांच्यासमवेत पंपासंबंधीची तीन एकस्वे (पेटंट) मिळविली होती. संगमरवरावर कोरीव काम करण्याचे एक यंत्र त्यांनी १८२३ मध्ये विकसित केले. १८२२ नंतर विद्युत विषयक प्रयोगात त्यांनी सातत्याने विशेष रस घेतला. १८३२ मध्ये फ्रान्सहून जहाजातून परत येतानाच्या प्रवासात चार्लस टी. जॅक्सन यांनी मोर्स यांना लांब अंतरावर विद्युत प्रेषण करणारे व फ्रान्समध्ये मिळवलेले एक उपकरण दाखविले. यामुळे मोर्स यांना विद्युत व तारायंत्र या विषयांत अधिक स्वारस्य निर्माण झाले.

- Advertisement -

पुढील तीन वर्षे त्यांनी अनेक प्रयोग करून १८३५ मध्ये पहिले विद्युत चुंबकीय तारायंत्र उपकरण तयार केले. यात एक विद्युत मंडल चालू व बंद करून संकेत प्रेषण करणारा प्रेषक, संकेतांची नोंद करणारा विद्युत चुंबकीय ग्राही आणि संकेतांचे अक्षरे व संख्या यात रूपांतर करणारी सांकेतिक लिपी यांचा समावेश होता. त्यांनी योजलेले ठिपके (डॉट्स) व प्रास (डॅशेस) यांवर आधारलेली सांकेतिक लिपी अद्यापही त्यांच्या नावाने ओळखली जाते. पुढे त्यांनी अधिक लांब अंतरावर संदेश पाठविण्यासाठी विद्युत चुंबकीय अभिचालित्रांच्या प्रणालीचा शोध लावला. अशा या महान संशोधकाचे २ एप्रिल १८७२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -