घरसंपादकीयदिन विशेषकवी, कथालेखक, शिल्पकार दिलीप चित्रे

कवी, कथालेखक, शिल्पकार दिलीप चित्रे

Subscribe

दिलीप पु. चित्रे यांचा आज स्मृतिदिन. दिलीप चित्रे हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणार्‍या ‘लघुनियतकालिक चळवळी’मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी बडोदा या ठिकाणी झाला. त्यांची कविता हा मर्ढेकरोत्तर काळातील एक महत्वाचा टप्पा आहे. चित्रे यांच्या एकूण कवितांची संख्या जवळपास हजारांहून अधिक आहे. त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजी, हिंदी या भाषांबरोबरच इतरही भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

इंग्रजीत त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. असे द्वैभाषिक कवित्व त्यांच्याकडे होते. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ते कविता लिहीत होते. महाविद्यालयात असताना ‘रुईयाईट’ या वार्षिक अंकात त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. १९६० साली त्यांचा ‘कविता’ हा संग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. या संग्रहातील बहुतेक कविता या त्यांच्या महाविद्यालयीन काळातील आहेत. त्यानंतर वाचा प्रकाशनाने त्यांचे ‘कवितेनंतरच्या कविता’ (१९७८) व प्रास प्रकाशनाने ‘दहा बाय दहा’ (१९८३) हे संग्रह प्रकाशित केले.

- Advertisement -

चित्रे यांना बालपणापासून विविध गोष्टींमध्ये, कलांमध्ये रस होता. चित्रकला, संगीत आणि वाङ्मयाची आवड त्यांनी बालपणापासून जोपासलेली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत बडोदा आणि मुंबई या नगरांचा मोठा वाटा आहे. या नगरांमधील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाने त्यांचे भरणपोषण केलेले आहे. या दोन शहरांतील उदारमतवादी, सहिष्णुतावादी खुल्या वातावरणाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम चित्रे यांच्यावर झाला. बडोदा आणि मुंबईच्या खुणा केवळ भाषा आणि चारित्र्यावरच नाही, तर त्यांच्या लिखाणावरही होत्या. त्यांच्या कवितेचे प्रमुख केंद्र स्त्री-पुरुष संवेदनेचे आहे. अस्तित्वाचा एक प्रमुख आविष्कार म्हणून या केंद्राला त्यांच्या कवितेत केंद्रीय स्थान आहे. त्यांच्या प्रेमकवितेत शारीरिकतेला महत्वाचे स्थान आहे. मराठी कवितेत क्वचितच भेटणारे मानवी शरीराचे थेट उच्चार चित्रे यांच्या कवितेत आहेत. अशा या प्रतिभावान कवीचे १० डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -