घरसंपादकीयदिन विशेषआधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक केशवसुत

आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक केशवसुत

Subscribe

कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत हे आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी होते. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १८६६ रोजी रत्नागिरीतील मालगुंड येथे झाला. त्यांचे शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकर्‍या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले.

केशवसुतांनी विद्यार्थीदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. केशवसुतांनी लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या कविता महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते.

- Advertisement -

त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्डस्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपाखरू’ (१९००) या त्यांच्या काही महत्वाच्या निसर्गकविता होत. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणार्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही त्यांची कविता विशेष गाजली. अशा या महान कवीचे ७ नोव्हेंबर १९०५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -