घरसंपादकीयओपेडभारताचा सूर्य तळपतोय, संधीचं सोनं करतोय!

भारताचा सूर्य तळपतोय, संधीचं सोनं करतोय!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघात मधल्या स्थानी आपली हुकुमत गाजवणारा सूर्य अल्पावधीत तळपला असून, अवघ्या २४ टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये त्याने आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. १९९० मध्ये मुंबईत जन्मलेल्या सूर्याने हटके फटके आणि आक्रमक शैलीत आग ओकत आशिया चषकात आपली दावेदारी सिद्ध केली आहे. अवघ्या २३ सामन्यांत आयसीसी क्रमवारीत नंबर दोन वर विराजमान झालेल्या सूर्यकुमारला आता पाकिस्तानच्या बाबर आझमला नंबर वनवरून हटवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, मात्र ती क्षमता त्याच्या अंगी आहेच. त्याच्यासह करोडो क्रिकेटप्रेमींची ही इच्छा याच आशिया चषकात पूर्ण होवो आणि पुन्हा एकदा हा चषक भारतीय धुरंधरांच्या हाती दिसो, एवढीच अपेक्षा!

कुठल्याही संघाची मधली फळी ही कणा समजली जाते. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर जबाबदारीही मोठी असते. अशा स्थितीत विस्फोटक कामगिरी करणे तितके सोपेही नसते. मात्र, याला अपवाद ठरत काही फलंदाज आपल्या शैलीत अनेक विक्रमांना गवसणी घालतात. त्यातीलच एक नाव आता समोर येतेय, ते म्हणजे सूर्यकुमार यादव. भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही झेंडा रोवायला सुरुवात केली आहे. खरं तरं, सूर्याला तळपायला आणि टीम इंडियाच्या निळ्या रुबाबदार जर्सीत यायला मोठा कालावधी जावा लागला, मात्र, संघाचे दरवाजे खुले होताच त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करून दाखवले. सूर्याने भारतीय संघात आगमन करताच अल्पावधीत आपल्या आक्रमकतेचे दर्शन घडवत थेट आयसीसी क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे आशिया चषकादरम्यान बाबर आझमला मागे टाकून जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनण्याची मोठी संधी आहे. तिचं तो सोनं करण्यात मागे पडणार नाही, असा भरवसा प्रत्येक भारतीयाला आहे यात शंका नाही. सूर्यकुमार यादवने अलीकडच्या काळात भारतासाठी टी-20 सामन्यांमध्ये तुफान फलंदाजी करताना संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. मध्यंतरी अल्पशा दुखापतीने त्याला ग्रासले होते. मात्र, त्यातून तात्काळ तो बाहेर आला आणि परत आपल्या लयीमध्ये परतलाही. सूर्या आता भारताच्या महत्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. आभाळाएवढी अचिव्हमेंट मिळवणार्‍या सूर्याला ‘स्काय’ नावाने ओळखले जाऊ लागल्याने त्याच्याकडून अपेक्षाही तितक्याच वाढल्या आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना सूर्याने 23 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या दमदार फलंदाजीमुळे आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. मुळात त्याची ही घोडदौड पाहिल्यास सूर्या पहिल्या सामन्यात ११७८ क्रमांकावर होता. यानंतर पाचव्याच सामन्यात त्याने ७७ व्या स्थानी झेप घेत सर्वांनाच थक्क केले. यानंतर दहाव्या सामन्यातच सूर्या ६० नंबरवर येऊन पोहोचला. १५ व्या सामन्यात ४९, तर २० व्या सामन्यात त्याने पुन्हा हनुमानउडी घेत थेट चौथ्या स्थानी झेप घेतली होती. अल्पावधीत टॉप फाईव्हमध्ये पोहोचत सूर्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत भारतीय क्रिकेटप्रेमींचेच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. यानंतर दोनच सामन्यांत तो शतकी आणि विजयी योगदान देणारी खेळी करत थेट दुसर्‍या स्थानी विराजमान झालाय. अनेक दिग्गजांना शक्य न होणारी कामगिरी करत सूर्याने आग ओकत तुफानी खेळी केल्या आणि आता टॉप टी-२० बॅट्समन बनण्यासाठी तो सज्ज झालाय. यासाठी त्याला आशिया कपसारखी चांगली संधीही चालून आली आहे.

मुख्य म्हणजे, एवढ्या छोट्या टी-20 कारकिर्दीत ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया अनेक दिग्गजांनी दिल्या आहेत. आता आशिया चषक 2022 मध्ये सूर्यकुमारने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला तर तो आयसीसी टी-२० क्रमवारीत 818 रेटिंगसह अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमला सहज मागे टाकू शकतो आणि जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाज बनू शकतो, हे मात्र नक्की! सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खासकरून टी-२० फॉरमॅटमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 24 टी-20 सामन्यांमध्ये 37.3 च्या सरासरीने आणि 175.4 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 672 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या आग ओकणार्‍या बॅटने पाच अर्धशतके आणि एक दमदार शतक झळकावले आहे. यामुळेच तो अनेक दिग्गजांना मागे टाकत टॉप फाईव्हमध्ये पोहोचलाय.

- Advertisement -

के.एल.राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि रोहित शर्मा यांच्यानंतर सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये भारतासाठी शतक झळकावणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. मुख्य म्हणजे सूर्याने झळकवलेले शतक हे इंग्लंडविरुद्ध असल्याने त्याला विशेष महत्व देता येईल. याशिवाय सूर्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलयचे झाले तर त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी खेळल्या गेलेल्या 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34 च्या सरासरीने फलंदाजी करत 340 धावा केल्या आहेत. यातही 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार यादवने अलीकडेच त्याचे नाव ‘स्काय’ कसे पडले, याचा खुलासा केला होता. सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील सुरुवातीचे काही सत्र कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत घालवले. त्यावेळी केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर हा भारतीय संघाचा माजी सलामीवीर होता. गौतम गंभीर हा अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांनी सूर्यकुमार यादवची प्रतिभा चटकन ओळखली. त्यामुळेच त्याची प्रतिभा पाहून गौतम गंभीरने त्याला ‘स्काय’ हे टोपण नाव दिल्याचे सूर्या सांगतो.

- Advertisement -

सूर्यकुमार यादव आता भारतीय संघाच्या मधल्या फळीचा एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपल्या हटक्या शैलीत सातत्याने धडाकेबाज खेळी करत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे सूर्याचा गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी त्याला वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या पांढर्‍या चेंडूच्या मालिकेतही संधी देण्यात आली होती. स्कायने यातही चांगली कामगिरी केली. सूर्याने टीम इंडियामध्ये आता अढळ स्थान मिळवले असल्याने आगामी काळात टीम इंडियासाठी तो नक्कीच मोठ्या खेळी साकारताना दिसेल यात शंका नाही.

सूर्याची खासियत म्हणजे, बहुतांश वेळा पॉवर हिटर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलंदाजांना हार्ड लेन्थवर पडलेले चेंडू ओळखणे आणि ते खेळणे अत्यंत अवघड जाते. पण अशा स्थितीत सूर्यकुमार यादव स्वतःला प्रभावी सिद्ध करतो. तो असे चेंडू विकेटच्या मागे रिकाम्या जागी पाठवतो, हे विशेष. हा शॉट तो इतक्या झटकन खेळतो की त्याचे ते खेळणे त्या शॉटचे सौंदर्य आणखीनच खुलवते आणि पाहणार्‍यांच्या भुवया उंचावते. त्याचा रॅम्प शॉटही डोळ्यांचे पारणे फेडतो. सूर्या आखूड चेंडूंवर हा शॉट खेळतो. जेव्हा चेंडू जवळजवळ स्टंपवर आलेला असतो, तेव्हा अत्यंत चपळाईने सूर्या त्याला बॅट लावतो, कधीकधी इतका उशीर शॉट खेळतो की यष्टीरक्षक चेंडू पकडण्याच्या तयारीत असतो आणि सूर्यकुमार मध्येच आपली बॅट आणून चार किंवा सहा धावा हिसकावून घेतो. ही झाली त्याच्या हटके फलंदाजीची चर्चा. मात्र, कमी चेंडूत अधिकाधिक धावा वसूल करणे हीच त्याची नैसर्गिक खेळी म्हणून ओळखली जाते.

अशा अनेक गोष्टींमुळे या फलंदाजाला कमी वेळेत आयसीसी टी-20 क्रमवारीत स्वत:ला टॉप फाईव्हमध्ये स्थान मिळवता आलं. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम विराजमान आहे, तर सूर्यकुमार यादव दुसर्‍या क्रमांकावर आहे. आशिया चषकात भारताची कामगिरी नेहमीच उजवी राहिली आहे. पाकिस्तानकडे तुफान गोलंदाजांची खाण असली तरी भारताच्या या रन मशीनचे हटके शॉट्स त्याला रोखू शकणार नाहीत, अशी मनीषा अनेकजण बाळगून आहेत. बाबरपेक्षा सूर्यकुमार यादव केवळ १० गुणांनी पिछाडीवर आहे. म्हणजेच ८०८ गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, भारताला दुसर्‍या इनिंगमध्ये फलंदाजीची संधी मिळाल्यास सूर्यकुमारची ही अचिव्हमेंटची उत्कंठा फार काळ राहणार नाही.

मुंबईत जन्मलेल्या सूर्यकुमार यादवच्या टी-20 आकड्यांवर नजर टाकल्यास, त्याने 23 सामने खेळले आहेत आणि 21 डावांमध्ये सूर्यकुमार यादवने 175.46 च्या स्ट्राइक रेटने 672 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 धावा आहे. यादरम्यान सूर्यकुमार यादवने 5 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले. याशिवाय 66 चौकार आणि 37 उत्तुंग षटकार मारले आहेत. मुख्य म्हणजे, यातील अनेक खेळी त्याने विजय मिळवून देताना साकारल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये सूर्यकुमारची खेळी महत्वपूर्ण राहिली आहे. खरेतर आयपीएलमुळेच सूर्यासाठी भारतीय संघाची कवाडे खुली झाली. त्याने १२३ आयपीएल सामन्यात १०८ डाव खेळताना २६४४ धावा कुटल्या आहेत. यात ८२ ही त्याची सवोत्तम धावसंख्या आहे. १६ अर्धशतकेही त्याने लगावली आहेत. यात २८४ चौकार आणि ८४ षटकारांमुळे आयपीएलच्याही इतिहासात त्याची कामगिरी लक्षणीय ठरते. आता आशिया चषकात पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंकेच्या वेगवान मार्‍यापुढे सूर्य किती तळपतो, ते पाहणे अधिक रंजक ठरणार आहे. त्याच्या योगदानामुळे आणि अनुभवी विराट कोहली, रोहित शर्मा, आश्विन, भुवनेश्वर, पंड्या, के. एल. राहुल यांच्या समावेशात निश्चितच भारताला चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया चषक उंचावता येईल, यात शंका नाही.

– साईप्रसाद पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -