घरठाणेमालाड येथे पाण्याच्या प्रवाहात तरुण गेला वाहून, भिवंडीत 14 वर्षीय बालिकेचा बुडून...

मालाड येथे पाण्याच्या प्रवाहात तरुण गेला वाहून, भिवंडीत 14 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू

Subscribe

मुंबई : मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी नाले भरून वाहू लागले. मालाड (पूर्व) येथे पाण्याच्या प्रवाहात एक तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नाही.

प्राप्त माहितीनुसार, क्रांती नगर, पोलीस चौकीजवळ, कुरार गाव, मालाड (पूर्व) येथे बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चंदन दिलीप शहा (25) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात अचानकपणे तोल जाऊन पडला. त्या प्रवाहासोबत तो वाहून गेला. अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस यांनी अँकर हुक, रोप यांच्या मदतीने स्थानिक लोकांसोबत कसून शोध घेतला. मात्र मुसळधार पाऊस, अंधार आणि पाण्याचा प्रवाह पाहता रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर शोधकार्य थांबविण्यात आले.

- Advertisement -

भांडुप येथे स्लॅब कोसळून पाचवर्षीय मुलीचा मृत्यू
भांडुप (पश्चिम), सोनापूर, क्रॉस रोड येथे तळमजला अधिक पाच मजली झकेरिया या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 202मध्ये मध्य रात्री 3 वाजताच्या सुमारास रहिवासी झोपेत असताना स्लॅब कोसळून तसीन शेख ही पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी तात्काळ नेण्यात आले. मात्र तिथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भिवंडीत 14 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील टेमघर स्मशान भूमी येथील नाल्यामध्ये वाहून गेल्याने सुजाता बबन कदम या 14 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

- Advertisement -

दिवसभरात 27 ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही बरसणाऱ्या पावसाने बेसावध मुंबईकरांना झोडपून काढले. या पावसाच्या तडाख्यात शहर भागात 8 ठिकाणी तर उपनगर भागांत 19 ठिकाणी अशा 27 ठिकाणी झाडे-फांद्या यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. तर शहर व पूर्व उपनगरे भागात प्रत्येकी एका ठिकाणी घरांच्या काही भागांची पडझड झाली. तसेच, शहर भागात दोन ठिकाणी तर पश्चिम उपनगर भागात एका ठिकाणी अशा तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -