घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये त्रिशंकूच, आता महापौर कुणाचा?

अहमदनगरमध्ये त्रिशंकूच, आता महापौर कुणाचा?

Subscribe

अहमदनगर महानगर पालिकेमध्ये यंदा त्रिशंकू परिस्थिती दिसत असून जागांच्या आकडेवारीच्या जोरावर शिवसेनाच महापौरपद स्वत:कडे राखणार असं चित्र दिसत आहे.

आपला गेल्या १५ वर्षांचा इतिहास कायम राखत अहमदनगरच्या मतदारांनी यंदाच्या महानगर पालिका निवडणुकीतही कुणालाही स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता नक्की सत्ता कुणाची असणार? आणि महापौरपदी कोण बसणार? याचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. मात्र, सध्याची आकडेवारी पाहाता नगरमध्ये महापौरपदासाठी घोडेबाजार रंगण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सगळे निकाल हाती आल्यानंतर शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा एकदा जोरदार कामाला लागण्याची शक्यता आहे.

काय सांगतो इतिहास?

२००३मध्ये अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाली. पहिल्याच निवडणुकीत शिवसेना-भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. महापौरपद शिवसेनेकडे गेलं खरं. पण सेना-भाजपमध्ये झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसने बाजी मारत महापौरपद खिशात घातलं. २००८मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा जनतेनं सेना-भाजपला बहुमताच्या जवळ पोहोचवलं. पण पुन्हा एकदा शिवसेना-भाजप अंतर्गत मतभेदांमुळे महापौरपद स्वत:कडे राखू शकले नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरपद घेतलं. दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा ते शिवसेनेकडे आलं. २०१३मध्ये मात्र आधीच्या अनुभवांतून शहाण्या झालेल्या नगरकरांनी कुणालाच बहुमत न देता सर्वच पक्षांना थोडं थोडं यश दिलं. या निवडणुकीत शिवसेना १७, भाजपा ९, काँग्रेस ११, राष्ट्रवादी काँग्रेस १८, मनसे ४ आणि अपक्ष ९ जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादीनं पहिल्या टर्मसाठी संग्राम जगताप यांच्या रुपाने महापौरपद मिळवलं खरं, पण विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप आमदार झाल्यामुळे दुसऱ्या टर्मसाठी महापौरपद शिवसेनेकडे गेलं.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – अहमदनगर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यावर लाठीचार्ज

महापौरपद पुन्हा शिवसेनेकडेच?

वरची आकडेवारी बघितली, तर गेल्या १५ वर्षांमध्ये अहमदनगरला ७ महापौर लाभले. मात्र, यात एकदाही भाजपला संधी मिळालेली नाही. यंदाचीही आकडेवारी पाहिली, तर भाजपला महापौरपद मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. सर्वाधिक जागांसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेत सत्तेत यायचं असेल, तर भाजपला शिवसेनेसोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही. कारण इतर पक्षांना सोबत घेऊन देखील भाजपला सत्ता मिळवणं अशक्य आहे. आणि सध्याच्या घडीला जरी शिवसेनेसोबत युती झाली, तरी सत्तेतला मोठा वाटा स्वत:कडे असल्यामुळे महापौरपद देखील शिवसेना स्वत:कडेच ठेवेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -