घरमहाराष्ट्रखेळ जन्मतारखेचा! छंद नोटांच्या आकड्यांचा!!

खेळ जन्मतारखेचा! छंद नोटांच्या आकड्यांचा!!

Subscribe

नोटा जमवून साधला कायम रोजगार

माणसाच्या आयुष्यात जन्मतारीख, लग्नाची तारीख, मुलाच्या किंवा मुलीची जन्मतारीख अशा तारखांना फार महत्त्व असते. अनेकजण आपल्या लग्नाची किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या तारखेचा उल्लेख फोटो अल्बममध्ये करून ते फोटो आपल्या संग्रही ठेवतात. आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तारखेचे चलन म्हणजे नोटच आपल्याला मिळाली तर ती नोट आपण नक्कीच जतन करून ठेवू. पुण्यातील पारस जैन या व्यक्तीला अशाच प्रकारे नामवंत व्यक्तींच्या जन्मदिवसाच्या नोटा जमा करण्याचा छंद आहे. या छंदासाठी काहीही करायची तयारी असलेल्या पारस यांना त्यांच्या छंदाने रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे आपल्या जन्म किंवा लग्न तारखेच्या नोटेची मागणी करत असतात.

पुण्यातील रहिवासी असलेले पारस जैन (नाबरिया) यांचा मार्केट यार्ड, गुलटेकडी येथे किराणा मालाचे वडिलोपार्जित दुकान आहे. 10 वर्षांपूर्वी ते दुकानात बसले असताना त्यांच्या हाती एक नोट आली. त्या नोटेवरील क्रमांक हा त्यांना जवळचा वाटला, पण नेमका तो क्रमांक कसला आहे.

- Advertisement -

हे त्यांच्या लक्षात येईना. रात्री घरी गेल्यावर ती नोट न्याहाळत असताना नोटेवरील क्रमांक हा त्यांची जन्मतारीख असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जन्मतारखेची नोट मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. मात्र त्यानंतर त्यांना एक वेगळाच छंद जडला. आपल्याप्रमाणे अन्य लोकांच्या जन्मतारखांच्या नोटा मिळू शकतात का, याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यातूनच त्यांनी लता मंगेशकर, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींच्या जन्मतारखेच्या नोटा त्यांनी जमवल्या. या जमवत असताना त्यांना त्यांचे मित्रमंडळी, कुटुंबातील व्यक्तींच्या जन्मतारखेच्याही नोटा मिळाल्या. विशिष्ट क्रमांकाच्या नोटा जमवताना त्यांच्या एका नातेवाईकाने बँकेतून नोटा मिळू शकतात असा सल्ला दिला. त्यांनी बँकेत संपर्क साधला असता, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

जन्मतारीख, लग्नतारीख, 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रत्येक वाढदिवसाची एक नोट पारस यांच्याकडे मिळत असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्याकडे नोटा मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काहीजणांना पारस यांनी अशाच नोटा दिल्या. पण या नोटा मिळवण्यासाठी होणारा खर्च, अडचणी, करावा लागणार प्रवास या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी लोकांकडून नोटांची आकर्षक फ्रेम किंवा ग्रीटिंग बनवून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पारस यांच्या छंदाचे आपोआपच व्यवसायात रुपांतर झाले. नोटा विकणे कायद्याने गुन्हा असल्याने पारस विशिष्ट क्रमांकाच्या नोटेचे कोणतेही मूल्य घेत नाहीत. परंतु आकर्षक फ्रेमच्या माध्यामातून ते उत्पन्न मिळवत आहेत.

- Advertisement -

विशिष्ट क्रमाकांच्या नोटा जमवताना पारस यांना सुरुवातीला वडिलांनी विरोध केला, परंतु भाऊ गौतम जैन व पत्नी संगीता जैन पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानेच हा छंद जोपासू शकलो. तसेच छंदाचे व्यवसायात रुपांतर झाल्यानंतर आता मुलगी हिमांगीनी व मुलगा कुणाल हे दोघेही यामध्ये मदत करत असल्याचे पारस जैन यांनी सांगितले.

पारस यांनी गोळा केलेल्या नोटा
पारस यांनी आतापर्यंत 350 पेक्षा अधिक व्यक्तींच्या जन्मतारखेचा क्रमांक असलेल्या नोटा जमा केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने लता मंगेशकर, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, शरद पवार, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, स्व. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एमडीएचचे मालक, उद्योजक संजय घोडावत यांच्यासह अनेक राजकीय नेते व सरकारी अधिकार्‍यांच्या जन्मतारीख व लग्नाच्या तारखांच्या नोटांच्या फ्रेम बनवल्या आहेत. जैन समाजाचे धर्मगुरू श्री गणेश लालजी महाराज (जालना) यांची जन्मतारीख, त्यांनी दीक्षा घेतलेला दिवस व त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस असलेल्या क्रमाकांच्या नोटा त्यांनी जमवल्या आहेत.

लतादीदींच्या नोटेसाठी पाहिली 10 वर्षे वाट
लता मंगेशकर यांचे चाहता असलेल्या पारस यांनी लता दीदींच्या जन्मतारखेसाठी 1 ते 1000 पर्यंतच्या नोटा जमावण्यास सुरुवात केली. परंतु लतादीदींची जन्मतारीख असलेली 2 रुपयांची नोट त्यांना काही केल्या मिळत नव्हती. ही नोट मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बँकांमध्ये व नोटांचा संग्रह करणार्‍या व्यक्तींकडे चौकशी केली. सर्वच स्तरावर अपयश हाती आले. परंतु पारस यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर 10 वर्षांनी त्यांना 2 रुपयांची नोट एका मित्रामार्फत सापडली.

500 रुपयांपासून मिळते ग्रिटिंग
जन्मतारेखच्या विशिष्ट क्रमांकाच्या नोटसाठी बनवण्यात येत असलेले ग्रीटिंग 500 रुपयांपासून देण्यात येते. तर विशिष्ट नोटांच्या आकर्षक फ्रेम हजारापासून 10 हजारापर्यंत देण्यात येतात. या फ्रेममध्ये आकर्षक डिझाईन्स काढण्यात येतात. त्यामुळे प्रत्येकाला ही आपल्या संग्रही ठेवायलाही आवडते.

विकले पत्नीचे दागिने

2009 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे व्यवसायात त्यांना नुकसान सोसावे लागले होते. त्यातच पारस यांना विशिष्ट क्रमांकाची नोट मिळवण्यासाठी बर्‍याचदा अधिक पैसे मोजावे लागत असत. विशिष्ट क्रमांकाची नोट मिळवण्यासाठी आर्थिक तंगीमुळे पैसे नसल्याने नोटा मिळवण्यासाठी पत्नीचे दागिने विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -