घरमहाराष्ट्रदिशाची आत्महत्याच; घाणेरडे राजकारण न थांबल्यास आम्हीही आत्महत्या करू

दिशाची आत्महत्याच; घाणेरडे राजकारण न थांबल्यास आम्हीही आत्महत्या करू

Subscribe

आमच्या आत्महत्येला ‘ते’ जबाबदार ठरतील

एक मोठी बिझनेस डिल तुटल्याने, त्यातून मोठे नैराश्य आल्याने दिशाने आत्महत्या केली. हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, दोन वर्षांनंतर पुन्हा केस ओपन करून, तिच्या नावाने घाणेरडे राजकारण करून तिला आणि आम्हाला बदनाम करायचे प्रकार राजकारणी लोकांनी थांबवावेत. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, असे आवाहन दिशा सालियन हिची आई वसंती आणि वडील सतीश सालियन यांनी केले आहे. मंगळवारी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिशाची आई खूपच भावूक झाली. थोडा वेळ निःशब्द झाल्यानंतर त्यांच्या भावनांचा बांध तुटला. आमची बदनामी न थांबल्यास आम्हाला आत्महत्या करावी लागेल आणि आमच्या मृत्यूला ‘ते’ राजकारणी जबाबदार असतील, असा इशाराही दिशाच्या आई-वडिलांनी दिला.

दिशाच्या आई-वडिलांनी दिशाच्या नावाने सुरू असलेले राजकारण, कुटुंबियांची होत असलेली बदनामी आणि मानसिक छळ थांबविण्याबाबत राज्य महिला आयोग व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे तक्रार लिखित केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सुप्रदा फातर्फेकर, गौरी छाब्रिया यांनी दिशा सालियन हिच्या मुंबईतील घरी भेट देऊन तिच्या कुटुंबाची विचारपूस केली. याप्रसंगी, दिशाच्या आई-वडिलांची महापौर व राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसोबत दीड तास चर्चा झाली.

- Advertisement -

दिशाच्या दुःखी, भावनाशील आई-वडिलांची तक्रार

दिशाने, तणावाखाली येऊन आत्महत्या केली. त्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले. आज दोन वर्षे झाली. आम्ही त्या प्रकरणी आमचे स्टेटमेंट दिले आहे. आम्ही कसेतरी तिच्या आठवणीत दुःखात जगत आहोत. पोलिसांनी तपास केला. पोस्टमार्टेमही झाले होते. माझ्या मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, आता पुन्हा दोन वर्षांनी तिची फाईल ओपन करून पुन्हा चौकशी करून उगाच राजकारण केले जात आहे. आमच्या दिशाच्या नावाने उगाच आमची बदनामी केली जात आहे. अशाने तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तसेच, आम्हाला आणखीन दुःख दिले जात आहे, अशा भावना दिशा सालियन हिची आई वसंती सालियन यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दिशा आम्हाला सोडून गेली. त्यामुळे आम्ही अगोदरच मोठ्या दुःखात सापडलो आहोत. आता तिच्या मृत्यूचे काही राजकीय लोक भांडवल करून घाणेरडे राजकारण करीत आहेत. त्यामुळे आम्ही आणखीन त्रस्त झालो आहोत. त्या घाणेरड्या राजकारणामुळे जगावे असे वाटत नाही. माझी हात जोडून विनंती आहे की, यापुढे नेते, अभिनेते यांनी कोणीही आम्हाला उगाच त्रास होईल, असे वागू नये. हे असेच सुरू राहिल्यास त्याचा आणखीन जास्त त्रास आम्हाला होईल. आता आम्हाला जगावे असे वाटत नाही. आम्ही आमचे जीवन संपवलेले बरे, असे वाटत आहे. आमची हात जोडून विनंती आहे की, तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, असे दिशाची आई वसंती सालियन यांनी म्हटले आहे.

तिचा खून वगैरे झालेला नाही, तिने तणावाखाली येऊन आत्महत्या केली आहे. तिच्या मित्र, मैत्रिणी यांनाही माहीत आहे. तिचे मोठे बिझनेस डिल तुटल्याने ती टेन्शनमध्ये होती. मी तिची त्यावेळी समजूतही काढली होती. मात्र, तणावाखाली येऊन तिने आत्महत्या केली. मात्र, तरीही तिच्या नावाने उगाच राजकारण केले जात असून ते थांबविण्यात न आल्यास आम्ही आत्महत्या करू, असा इशारा दिशाच्या आई-वडिलांनी दिला आहे.

दिशाच्या नावाने घाणेरडे राजकारण थांबवावे –: महापौर

दिशाने आत्महत्या केली आहे. तिचा बलात्कार, खून वगैरे झालेला नाही. तिच्या आई-वडिलांनीच सांगितले आहे. सीबीआय व पोलीस तपासात तिची आत्महत्या झाल्याचे उघड आहे. तरीही मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे हे उगाचच दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून खून करण्यात आल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे दिशाच्या आई-वडिलांना त्याचा त्रास होत आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, दिशाच्या नावाने होत असलेले घाणेरडे राजकारण थांबवावे. तुम्हाला दिशा सालियन मृत्यू प्रकरणी जी काही माहिती हवी असेल तर पोलिसांकडे जाऊन माहिती घ्यावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

तक्रारीत राणेंचा उल्लेख, कारवाई होणार -:

सुप्रदा फातर्पेकर, गौरी छाब्रिया राज्य महिला आयोग सदस्य दिशा सालियन हिच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये, नारायण राणे, नितेश राणे यांच्या नावाचा उल्लेख पत्रात आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू. जे मीडियात ट्रायल चालतात, त्याबाबत सुद्धा तक्रार झाली आहे. २ लाख ६० हजार फेक अकाउंट बनवून त्यांच्या मुलीच्या बाबतीत बदनामी झाली आहे. त्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिशाच्या आई-वडिलांच्या तक्रारीची महिला आयोग दखल घेवून कारवाई करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -