घरगणपती उत्सव बातम्यागणपतीच्या दर्शनासाठी परवानगी देऊ नका!

गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी देऊ नका!

Subscribe

पुण्यात कोरोनाचा संसर्ग अजून काही थांबलेला नाही. त्यामुळे यंदा मानाच्या गणपतीसह कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देऊ नका, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पोलिसांना दिले. तसेच गणेशोत्सव काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु, यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. ’

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देऊन काम करावे.

तसेच कोरोनाबरोबरच पावसाळ्यातील अन्य संसर्गाचे आजार व सारी आजाराच्या रुग्णांवर वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ रुग्णदर व मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना देवून ‘करोना’च्या रुग्णांना खाटा अपुर्‍या पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -