घरमहाराष्ट्रधक्कादायक : मुंबईत पहिल्याच पावसात मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू; नालेसफाईची पोलखोल

धक्कादायक : मुंबईत पहिल्याच पावसात मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू; नालेसफाईची पोलखोल

Subscribe

 

मुंबई: मुंबईत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात गोवंडी, शिवाजी नगर, नवीन डेपोजवळील मॅनहोलमध्ये पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. महापालिकेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी कंत्राटंदाराच्या दोन कामगारांचा मॅनहोलमध्ये सफाई काम करताना पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. रामकृष्ण (२५) आणि सुधीर दास (३०), अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रतिक्षा करीत होते त्या पावसाने शनिवारी जोरदार बॅटींग केली. किंग्जसर्कल, टिळक नगर, अंधेरी, दहिसर सब वे, मिलन सब वे, सायन रोड नंबर २४, दादर टी टी आणि अन्य काही सखल भागात पावसाचे पाणी काही प्रमाणात साचले. साचलेल्या पाण्यामधूनच रस्ते वाहतूक सुरू होती. तर सायन रोड नंबर २४ येथे पावसाचे पाणी साचल्याने बेस्ट उपक्रमाने या मार्गाने धावणाऱ्या बस गाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

शहर भागापेक्षाही उपनगरे भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला. दहिसर येथे सर्वाधिक १४३.०१ मिमी त्याखालोखाल, विक्रोळी – ११९.८८ मिमी, मरोळ – ११९.८७ मिमी, दिंडोशी – ११५.०३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मुलुंड येथे २०.५६ मिमी इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबई महापालिका मुख्यालय परिसर – ९८.०९ मिमी, दादर – ८७.८७ मिमी, वडाळा – ७५.६७ मिमी, भायखळा – ७४.६७ मिमी, वरळी – ६८.३३ मिमी, कुलाबा – ६२.०० मिमी. दहिसर -१४३.०१ मिमी, मरोळ – ११९.८७ मिमी, दिंडोशी – ११५.०३ मिमी, बोरिवली – १०३.३९ मिमी, कांदिवली – ६८.०५ मिमी, गोरेगाव -६५.०२ मिमी. विक्रोळी – ११९.८८ मिमी, घाटकोपर – ९८.७७ मिमी, चेंबूर – ९६.७२ मिमी, कुर्ला – ९४.२५ मिमी, गोवंडी – ८२.५७ मिमी, भांडुप – ६८.०६ मिमी , मुलुंड – २०.५६ मिमी. पाऊस पडला.

- Advertisement -

हेही वाचाःPhoto : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, रस्ते जलमय

मुंबईत यंदा पावसाचे पाणी सखल भागात साचू नये, यासाठी सखल भागाच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप ४७७ कमी- अधिक क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, मिलन सब वे, अंधेरी सब वे आदी सखल भागात यंदा पावसाचे पाणी साचणार नाही, असा आत्मविश्वास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या नालेसफाई कामांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी केला होता. मात्र पहिल्याच पावसाच्या तडाख्यात पालिकेचा आत्मविश्वास किंग्जसर्कल, टिळक नगर, अंधेरी, दहिसर सब वे, मिलन सब वे, सायन रोड नंबर २४, दादर टि टी आणि अन्य काही सखल भागात पावसाचे पाणी काही प्रमाणात साचल्याने वाहून गेला की काय, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आज दिवसभरात पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. दरम्यान, आज सायंकाळी ४.१२ वाजताच्या सुमारास समुद्राला भरती होती व त्यावेळी समुद्रात ३.९२ मिटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने अगोदरच व्यक्त केली होती. त्यामुळे सुमद्राला भरती असताना अतिवृष्टी झाल्यास फ्लड गेट बंद करण्यात येतात. परिणामी मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात पावसाचे पाणी साचते.
मात्र आज एवढी अतिवृष्टी झाली नाही. पावसाच्या सरी बरसल्या. असे असताना सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकर पालिका यंत्रणेकडे बोट दाखवत आहेत. नालेसफाई कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईत पावसाचे पाणी का व कशामुळे साचले, असे प्रश्न उपस्थित करीत आहेत.

झाडे, फांद्या, घरे यांची पडझड, शॉर्टसर्किट

मुंबईत शनिवारी कोसळलेल्या पहिल्याच जोरदार पावसात शहर भागात ४ , पूर्व उपनगर भागात – २ तर पश्चिम उपनगर भागात ५ ठिकाणी अशा एकूण ११ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली.
तसेच, पश्चिम उपनगरातील एका ठिकाणी घराचा भाग पडल्याची घटना घडली आहे ; मात्र कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. त्याचप्रमाणे, शहर भागात ३, पूर्व उपनगर भागात २ तर पश्चिम उपनगर भागात २ अशा ७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

साचलेल्या पाण्याचा कमी अवधीतच निचरा : पालिकेचा दावा

किंग्जसर्कल व अंधेरी सब वे आदी सखल भागात काही प्रमाणात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे वेळेतच निचरा करण्यात आला आहे. तसेच, रस्ते वाहतूकही सुरळीत होती, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिका यंत्रणा सज्ज असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

तलावांत पाऊस आणि पाणीसाठ्यात वाढ होणे आवश्यक

मुंबईत दरवर्षी ७ जूनच्या आसपास किंवा फारतर १५ जूनपर्यन्त तरी पावसाचे आगमन होत असते. मात्र यंदा ‘बिपरजॉय’ वादळाच्या प्रभावामुळे व हवामानातील काहीशा बदलामुळे पावसाने हुलकावणी दिली. अधूनमधून अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र त्याने मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात काही वाढ झाली नाही. उलट पावसाने विलंब केल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी कमी होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत फक्त ९६,५३४ दशलक्ष लिटर इतकाच ( ६.६७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील २५ दिवस म्हणजे १८ जुलैपर्यंत पुरेल इतकाच होता.
मात्र आज सकाळच्या सत्रात व संध्याकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत चांगला पाऊस पडला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत काही प्रमाणात तरी पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात किंचित वाढ झाल्याचे समजते. तर, जून महिन्यातही उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना आजच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जाते.

…तर पाणी कपातीचे संकट अटळ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पुढील आठवड्याभरात अपेक्षित पाऊस पडून पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणे अटळ आहे. मुंबईत किमान १५ टक्के ते ३० टक्के पाणी कपात केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनाही अपेक्षित पाऊस पडून पाणीसाठ्यात वाढ होईपर्यंत तरी उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

आगामी २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट

आगामी २४ तासांत म्हणजे रविवारी दिवसभरात मुंबई व परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची पावसाळी व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी नागरिकांना पावसाबाबत सतर्क राहावे लागणार आहे.

 

वाळकेश्वर येथे झाड कोसळून १० वाहनांचे नुकसान

मुंबई महापालिका प्रशासन व उद्यान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, मलबार हिल, वाळकेश्वर, बिर्ला हायस्कुल समोरील गीतांजली इमारतीच्या आवारात असलेले आंब्याचे झाड तेथेच पार्क केलेल्या वाहनांवर शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे कोसळले. या घटनेत इमारतीच्या आवारातील १० वाहनांचे कमी – अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
मात्र झाड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पालिका विभाग कार्यालयाचे आणि उद्यान खात्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर वाहनांवर पडलेले झाड बाजूला केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -