घरमहाराष्ट्र१० वी शिकलेल्या गॅरेजचालकाने बनवले स्वदेशी हेलिकॉप्टर

१० वी शिकलेल्या गॅरेजचालकाने बनवले स्वदेशी हेलिकॉप्टर

Subscribe

हिंदुस्थान एरोनॉटिक कंपनीने प्रदीप मोहितेंचा केला सन्मान , चार अपयशी प्रयोगानंतर ३०० फूट वर उडाले हेलिकॉप्टर

पिंपरी-चिंचवड : स्वप्नांना पंखांचे बळ मिळाल्यास आपल्याला ध्येयापर्यंत पोहचता येते, हे एका मराठी तरुणाने दाखवून दिले. प्रदीप शिवाजी मोहिते असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. इयत्ता १०वीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रदीप यांना लहानपणापासून हेलिकॉप्टरची आवड होती, ते कागदाचे हेलिकॉप्टर बनवायचे. या ध्येयामुळे त्यांनी अखेर खरेखुरे हेलिकॉप्टर बनवले. ३०० फूट उंचीवर ते ५० कि.मी. फिरून आले. त्यांच्या या कामाची हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड या कंपनीनेही दखल घेत, या कामगिरीसाठी त्यांना ध्रुव हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रदीप शिवाजी मोहिते हे मूळ गाव वांगी ता. केडगाव,जि. सांगली येथील आहेत. सध्या ते पिंपरी-चिंचवड शहरात पत्नीसह वास्तव्यास असून ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांना गॅरेजचे सतरा हजार तर घराचे तीन हजार भाडे द्यावे लागते. श्री सिद्धनाथ नावाचे त्यांचे स्वतःचे गॅरेज आहे. प्रदीप यांना लहापणापासूनच हेलिकॉप्टर विषयी फार प्रेम होते. लहान असताना कागदाचे आणि लाकडी हेलिकॉप्टर ते बनवायचे. हेच प्रेम त्यांचे स्वप्न बनले आणि त्यांनी ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. शाळेत मन रमत नसल्याने प्रदीप यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शाळेला रामराम ठोकला. त्यानंतर आई-वडिलांनी गॅरेज मध्ये पाठवले. साडेचार वर्षे दुसर्‍याच्या गॅरेजवर काम केले आणि नंतर स्वतःगॅरेज सुरू करत हेलिकॉप्टरचे स्वप्न बाळगायला सुरुवात केली. स्वदेशी बनावटीचे पहिले हेलिकॉप्टर बनवायचे असा चंग प्रदीप यांनी बांधला, मात्र ते अनेक प्रयत्नांनंतरही त्यांचे स्वप्न साकार होत नव्हते.

- Advertisement -

थ्री इडियट चित्रपटातून प्रोत्साहन

2009 साली थ्री इडियट नावाचा हिंदी चित्रपट आला आणि प्रदीप यांच्या स्वप्नांना नवीन उमेद मिळाली. त्या चित्रपटातून प्रेरणा घेत प्रदीप यांनी जोमाने हेलिकॉप्टर बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा चारचाकी गाडीचे इंजिन बसवले आणि अवघ्या तीन वर्षार्ंत त्यांचे देशी बनावटीचे हेलिकॉप्टर हवेत झेपावले. यासाठी प्रदीपचे तीन वेळेस हेलिकॉप्टर क्रॅश झाले. पण अपयशाला खचून न जाता त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

४० लाख रुपये झाले खर्च

गॅरेजमधील आजपर्यंतचे सर्व पैसे हे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी त्यांनी खर्च केले. आतापर्यंत त्यांना 40 लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. त्यांनी सहा मॉडेल बनवले असून सातव्या मॉडेलला यश आले. सध्याचे हेलिकॉप्टर हे 300 फूट वर आणि 50 किलोमीटर फिरू शकते, अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडचे पायलट आणि अधिकार्‍यांनी प्रदीप यांना दिली. प्रदीप यांचे मित्र फौजी रमेश यांनी त्यांना आर्थिक बळ दिले. प्रदीप हे पायलट नसल्याने त्यांना हेलिकॉप्टरची चाचणी घेताना अनेक अडचणी आल्या. त्यांचा अनेकदा अपघातदेखील झाला. भविष्यात लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रदीप यांचा मानस आहे. यासाठी त्यांचा स्वप्नांच्या पंखाना सरकारने बळ द्यावे, असं दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -