घरमहाराष्ट्रसरकार विरोधात काँग्रेसच्या ५० जनसंघर्ष सभा

सरकार विरोधात काँग्रेसच्या ५० जनसंघर्ष सभा

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सरकारविरोधात ५० जनसंघर्ष सभा घेणार आहे. या सभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर आता काँग्रेस पक्षही सरकारच्या विरोधात ५० जनसंघर्ष सभा घेणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभा घेण्यात येणार आहेत.लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात ५० जाहीर सभा घेण्यात येणार असून उद्या म्हणजे गुरुवारी ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील दौलताबाद येथे पहिली जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

या संदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘केंद्रातील आणि राज्यातील नाकर्त्या आणि लोकविरोधी भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यभरात जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेच्या माध्यमातून साडे सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून १२० विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधला होता.’ सरकारविरोधातील संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी राज्यभरातील विविध शहरांमध्ये ५० जनसंघर्ष सभा घेण्यात येणार आहेत. या सभांचा माध्यमातून निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचून केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि अपयशाचा पंचनामा केला जाणार आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते आणि काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिली जनसंघर्ष सभा उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.०० वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबाद शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता औरंगाबादच्या पैठण येथे जाहीर सभा होणार आहे आणि सायंकाळी ५.३० वाजता पुणे शहरात जनसंघर्ष सभा आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -