घरमहाराष्ट्रकसारा घाटात रस्त्याला तडे; जुना घाट दोन महिने बंद राहण्याची शक्यता

कसारा घाटात रस्त्याला तडे; जुना घाट दोन महिने बंद राहण्याची शक्यता

Subscribe

संततधार कोसळणाऱ्या पावसाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या कसारा घाट रस्त्याला चांगलेच झोडपून काढले आहे. घाटाच्या दुतर्फा मार्गावर रस्त्याला तडे जाऊन रस्ता खचला आहे. तसेच वारंवार दरडी कोसळण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने रस्ते महामार्गाच्या नियोजन शून्यतेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून घाटमार्ग धोक्याच्या घंटेत अडकला आहे. घाटातून मार्गक्रमण करत असताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच सर्वत्र पावसाचा हाहाकार माजत असताना रविवारी जुना कसारा घाट रस्ता चिरला आहे. रस्त्याच्या डावीकडील दरीची बाजू आठ ते दहा फूट खचल्याच्या प्रकारात भर झाल्याने मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा मार्ग जवळपास दोन महिने बंद राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

रस्त्याला गेलेल्या तड्यांची रुंदी सात फूट असून खोली पाच ते सहा फुटांपर्यंत आहे तर लांबी सातशे मीटरपर्यंत पोहचली आहे. नवीन कसारा घाटात देखील हिच परिस्थिती ओढवल्याने रस्त्याला दहा ते पंधरा फुटाच्या अंतरापर्यंत तडे गेले आहेत. त्यामुळे घाटाच्या दुतर्फा वाहिनीवर वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. दोन्ही मार्गावरची वाहतूक नाशिक- मुंबई लेनवरून चालू ठेवण्यात आल्याने रस्तामार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता खचने,रस्त्याला तडे जाणे, रस्त्याच्या बाजूचे संरक्षण कठडे ढासळणे याला संबंधित कंपनी आणि ठेकेदाराच्या निकृष्ठ कामाचा नमुनाच जबाबदार असल्याचे जानकार लोकांमधून बोलले जात आहे. पावसाचं पाणी वेगाने येत असल्याने कसारा घाटात रस्ते खचण्याचा आणि दगड मातीचा खच रस्त्यावर येण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे घाट मार्गातून येताजाता प्रवाशांनी सतर्कता बाळगावी.

महामार्गाच्या रस्त्याचीही झाली दुर्दशा

ठेकेदाराने घेतलेल्या रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटत नाही कुठे तेच पावसाच्या तडाख्याने उखडले आहे. कसारा ते शहापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या दोन्ही वहिनीवर रस्त्याची चाळण होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पावसाच्या पाण्यात काही ठिकाणी रस्त्यावरचे डांबर वाहून गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठेकेदाराने कामासाठी वापरलेले साहित्य हलक्या दर्जेचे असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व वर्षानुवर्षा पासून निदर्शनास येत असतानासुद्धा याकडे रस्ते महामार्ग आणि संबंधित कंपनी ठेकेदाराच्या चालढकल कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची बोंब आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -