घरमहाराष्ट्ररिफायनरीसह सिडकोला विरोध

रिफायनरीसह सिडकोला विरोध

Subscribe

ग्रामस्थ संघर्ष समिती स्थापणार

रत्नागिरीच्या नाणारमधून हद्दपार झालेल्या महत्त्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाची धोंड रायगडच्या गळ्यात बांधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असला तरी या प्रकल्पासह जमीन खरेदी करणार्‍या सिडकोला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधाचा सामना करावा लागणार आहे. रविवारी तालुक्यातील पारंगखार येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत या विरोधाचा एल्गार करण्यात आला. यासाठी चाळीस गाव ग्रामस्थांची संघर्ष समिती स्थापन करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.

अलिकडे विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी रायगडमध्ये हलविण्याचे सूतोवाच करताच चर्चेला एकच उधाण आले. त्यानंतर प्रकल्प विरोधी व बाजूने सूर उमटू लागले. शेकापने तर या प्रकल्पाला सुरूवातीपासून विरोध केल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रगतीशील शेतकरी अनंत मगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीचे प्रास्ताविक अतुल पाटील यांनी केले. गावे उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आम्हाला यापुढे नकोत असे सांगून पाटील यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, मात्र या प्रक्रियेत पुढारी नव्हे तर ग्रामस्थ महत्त्वाचे असल्याचे ठणकावून सांगितले.

- Advertisement -

नाणार प्रकल्पाला शास्त्रोक्त पद्धतीने विरोध करणारे कोकण महाशक्ती संघाचे डॉ. मंगेश सावंत यांनी रिफायनरी म्हणजे काय, त्यापासून होणारे प्रदूषण, धोके व शासनाची या संबंधित दिशाभूल करण्याची भूमिका कशी असते, यावर सखोल मार्गदर्शन केले. तर नाणार प्रकल्पाच्या संदर्भात बनविण्यात आलेली ध्वनी चित्रफित सचिन चव्हाण यांनी सादर करीत स्थानिक शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सिडकोच्या संदर्भात नीलेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सिडको शेतकर्‍यांना प्रलोभने दाखवत त्यांच्या हक्काच्या जमिनी ताब्यात घेते, मात्र त्यानंतर स्थानिक शेतकर्‍यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी सिडकोच्या विरोधात लढा द्यावा लागतो, हे आपल्या अनुभवातून सांगितले.

यावेळी किशोर भाने, सचिन चव्हाण, लक्ष्मण आंबेकर, अनंत मगर, गणेश भगत, उद्देश वाडकर, अतुल पाटील, संदेश वाडकर, चंद्रकांत मोहिते, जयवंत पोकळे, नरेश घाग, हेमंत ठाकूर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -