घरमहाराष्ट्रअजित पवारांचे विश्वासू; शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार

अजित पवारांचे विश्वासू; शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आऊटगोईंग सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेवर अजित पवारांची पकड असल्याचे समजले जात होते. मात्र आता त्यांच्या गोटातील विश्वासू आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. शहापुरचे आमदार पांडुरंग बरोरा हे उद्या (१० जुलै) मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आपलं महानगरला मिळाली आहे. विधानसभेसाठी शिवसेनेकडून बरोरांना उमेदवारी निश्चित झाल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडांचा मात्र पत्ता कट झाला आहे.

पांडुरंग बरोरा हे २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची लाट असूनही निवडून आले होते. आमदार म्हणून आपल्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. स्थानिक शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्गाला विरोध करणे असेल किंवा शहापूरमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल बरोरा यांनी रस्त्यावर आंदोलने करत सभागृहात देखील आपल्या मतदारसंघाची बाजू प्रभावीपणे मांडली होती. आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप केले जात असल्याबद्दल बरोरा यांनी अजित पवारांना हे सर्व साहित्य देऊन विषयाचे गांभीर्य सांगितले होते. अजित पवार यांनी देखील आपल्या शैलीत अधिवेशनादरम्यान सभागृहात आदिवासी खात्याच्या मंत्र्यावर टीका केली होती.

- Advertisement -

स्थानिक गटबाजीला कंटाळून पक्षांतर

पांडुरंग बरोरा हे अजित पवार यांच्या मर्जीतले असले तरी स्थानिक गटबाजीमुळे ते आधीपासूनच त्रस्त होते. जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आणि त्यांचे वाद जगजाहीर आहेत. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी या दोघांमधील वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनाही यात यश आले नाही. यावेळी गटबाजीचा फटका पडू नये आणि सेनेत जिंकून येण्याची खात्री असल्यामुळेच बरोरा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगतात.

राष्ट्रवादी सोडतो तो जिंकून येतो

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून गेलेल्या अनेकांना निवडणुकीत विजय मिळाला आहे. २०१४ साली भिवंडीचे कपिल पाटील, सांगलीचे संजय काका पाटील हे राष्ट्रवादी सोडून गेले आणि खासदार झाले. त्यानंतर हेच चित्र विधानसभेलाही दिसले. किसन कथोरे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर ही काही आमदारांची उदाहरणे झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील दिंडोरीच्या भारती पवार आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने खासदारपदी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीतून निवडून येण्याची खात्री नसलेले अनेकजन भाजप-सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -