घरमहाराष्ट्रनामांकित कॉलेजांचा मार्ग खडतर

नामांकित कॉलेजांचा मार्ग खडतर

Subscribe

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्यासह मुंबईच्या निकालात यंदा कमालीची घसरण पहायला मिळाली आहे. एकीकडे निकालाचा टक्का घसरला असला यंदा ही निकालाची गुणवत्ता कायम राहिल्याने मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजांसाठी विद्यार्थ्यांना चांगलीच दमछाक करावी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा तब्बल ४ हजार ४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने ८० ते ९० टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना आवडत्या कॉलेजांच्या प्रवेशासाठी ताटकळत उभे रहावे लागणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात यंदा मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. तर काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून बारावी बोर्डातून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही अधिक असल्याने त्याचा थेट फटका तेरावी प्रवेशावर बसणार आहे. या वाढत्या निकालाच्या गुणवत्तेमुळे तेरावी प्रवेशावर थेट परिणाम म्हणून कॉमर्स शाखेसाठी प्रवेशाची चढाओढ जाणवणार आहे. मुंबईतील बहुतांश नामांकित कॉलेजांचे वाणिज्य शाखेचे बारावीचे निकाल ९५ टक्क्यांवर लागले आहेत. यामुळे या कॉलेजांमध्ये त्याच विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी संधी मिळणार आहे. परिणामी बाहेरील विद्यार्थ्यांना या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणे अवघड होणार आहे. विशेषत: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही चढाओढ असणार आहे.

- Advertisement -

कॉलेजांमध्ये इनहाऊस कोट्यामध्ये कॉलेजातून बारावी केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. यामुळे ज्या कॉलेजांचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या कॉलेजांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा शिल्लक राहतील, असा अंदाज मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यातच यंदा पदवी प्रवेशाला १६ टक्के मराठा आरक्षण लागू असणार आहे. याचबरोबर आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील सवर्णांसाठीचे आरक्षण लागू असणार आहे. यामुळे या कोट्यातून विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -